राज्यातील २०.५ एकर इतके मोठे उद्यान

ठाणे :  येथील कोलशेत भागातील २०.५ एकर जागेवर  उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे लोकपर्ण करत या पार्कला ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ असे नाव देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नावलौकिक जगभरात वाढविले आहे. आपल्या देशाचे कौतुक जगभरात होत आहे. याचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे या सेंट्रल पार्कला हे नाव देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलशेत येथील पार्कसिटी गृहप्रकल्प परिसरात ठाणे महापालिकेला विकास प्रकल्पांतर्गत २०.५ एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता. त्यावर महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या (कन्स्ट्रक्शन टीडीआर) माध्यमातून कल्पतरू विकासकाकडून ग्रँड सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित केले आहे. या उद्यानाचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे उपस्थित होते.

हेही वाचा >>> ठाणे: पदयात्रा मोर्चात २५ ते ३० आशास्वयंसेविकांना उष्मघाताचा त्रास

आमदार केळकर यांनी उद्यानाला ‘नमो सेंट्रल पार्क’ असे नाव देण्याची मागणी लोकपर्ण कार्यक्रमात बोलताना केली. ही मागणी मान्य करत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्यानाला नमो द ग्रँड सेंट्रल पार्क असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा केली. सेंट्रल पार्क ही संकल्पना ठाण्यामध्ये पहिल्यांदा होत आहे. राज्यातले हे मोठे उद्यान आहे. कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून हे काम केल्याने महापालिकेचा एकही पैसा खर्च न करता भव्य उद्यान तयार झाले आहे. वेगवेगळ्या देशातल्या उद्यानाच्या थीम येथे निर्माण करण्यात आल्या आहेत, असे शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> ठाणे : नमो सेंट्रल पार्कचे प्रवेश शुल्क दर जाहीर

हे पार्क प्राणवायु देण्याचे काम करणार आहे. जगभरातला अनुभव या उद्यानाध्ये घेता येणार आहे. येथे एक मिनिचर पार्क देखील करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. पर्यावरणाचा समतोल राखत सरकारने सर्व प्रकल्प राबवले आहेत. ठाण्यात लवकरच स्नो पार्क तयार केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना काश्मिर आणि स्वित्झर्लंडचा अनुभव घेता येणार आहे, असेही ते म्हणाले.

योगा, ध्यान धारणेसाठी स्वतंत्र व्यवस्था

या उद्यानाला विविध प्रकारची ३ हजार ५०० हून अधिक रोपे, फुल झाडे आहेत. मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. मुलांसाठी खेळायला जागा, जेष्ठांना चालण्यासाठी जॉगींग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटींग यार्ड, लॉन टेनीस, व्हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये करण्यात आली आहे. योगा, ध्यान धारणेसाठी देखील येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde rename thane central park as a namo central park zws