ठाणे : राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठाण्याच्या किसननगर भागातून लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी वागळे इस्टेट भागातील १५ कुटुंबाची भेट घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री घरी आल्याने अनेकजण भारावून गेले होते. दरम्यान, शासकीय योजनांवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये श्रेयवाद रंगल्याची चर्चेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा श्रेयवाद नसल्याचे स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या १० योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी तसेच या योजनांचा लाभ मिळतो की, नाही याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडून राज्यभरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील किसननगर आणि वागळे इस्टेटमधील १५ कुटुंबाची भेट देऊन केला. मुख्यमंत्र्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांना शासकीय योजनांची माहिती दिली. या अभियानादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही सरकार म्हणून एकत्रित काम करत आहोत. तसेच महायुतीतील आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित कार्यक्रम राबवित आहोत. महायुतीमधील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते लाभार्थी वंचित राहू नये म्हणून चहूबाजूंनी काम करत आहेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा

यापूर्वी शासन आपल्या दारी या योजनेत राज्यातील ५ कोटींहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला. सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरुन पाच लाख रुपये इतकी वाढविली आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, वारकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. या अभियानासाठी मोबाईल ॲप तयार करण्यात आला आहे. या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग होणार आहे. या ॲपचा वापर कार्यकर्ते अभियानादरम्यान करणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली. या शिकवणीनुसारच शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता काम करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर प्रत्येक शिवसैनिक या योजनेचा आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Story img Loader