भाजपा प्रणित लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना उद्धव ठाकरे यांनी आता पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असला, तरी याबाबतचा निर्णय आम्ही यापूर्वीच घेतलेला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच, “अशा प्रकारचे निर्णय त्यांनी अडीच वर्षांपूर्वी घेतले असते तर, आता ही वेळ आली नसती. ”, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी लगावला.

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमामध्ये आले होते. येथे त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन केले. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

…त्यामुळे शरद पवारांचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही –

“सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपाचे सरकार असून हे सरकार स्थिर आहे. तसेच हे सरकार योग्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंबंधी दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी काही भेट झाली आहे, ती सदिच्छा भेट होती.”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे –

तसेच, “राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करीत आहोत. जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल.”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, रविंद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader