भगवान मंडलिक
कल्याण- राज्यातील दारिद्रय रेषेखालील पिवळी शिधापत्रिका धारकांची दिवाळी गोड, आनंदात जावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील एक कोटी ८० लाख गोरगरीबांना दिवाळी फराळासाठी लागणारे आवश्यक साहित्य १०० रुपयांमध्ये शिधावाटप दुकानांमध्ये उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. घोषणा होऊन १५ दिवस उलटले. दिवाळी तोंडावर आली तरी ठाणे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील बहुतांशी शिधावाटप दुकानांमध्ये मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट पोहचली नसल्याने दुर्बल घटकांमधील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यात बळीराजा, सामान्यांचे सरकार आले आहे. महाराष्ट्रातील एकही घटक नाराज असता कामा नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामे, नागरी समस्या, सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा धडाका लावला आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचे सरकार राज्यात आल्यापासून सण, उत्सव आनंदात साजरे करण्यासाठी शासनस्तरावरुन मुभा दिली जात आहे. दुर्बल घटकातील नागरिकांची दिवाळी आनंद जावी म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी १५ दिवसापूर्वी महाराष्ट्रातील सुमारे एक कोटी ८० लाख दारिद्रय रेषे खालील (बीपीएल) घटकातील पिवळ्या शिधापत्रिका धारकांना त्यांची दिवाळी आनंदात जावी म्हणून दुर्बल घटकांना दिवाळी फराळ तयार करण्यासाठी लागणारे रवा, मैदा, चणाडाळ आणि पामतेल १०० रुपयांमध्ये शिधावाटप दुकानांमध्ये उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा >>> ठाणे : दुचाकी चालकाला वाचवण्याच्या नादात ट्रकचा अपघात; दोघांचा मृत्यू
दिवाळीपूर्वी हे कीट नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. आता दिवाळी तोंडावर आली तरी हे कीट ठाणे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील दुकानांमध्ये उपलब्ध झालेले नाही. काही दुकानांमध्ये पाच हजार लीटर पामतेल आले आहे, तर काही ठिकाणी रवा, मैदा येऊन पडला आहे. एकाच वेळी चारही वस्तू एका पोतडीत एक किलोप्रमाणे बांधून येतील. त्या वस्तू आपण लाभार्थींना द्यायच्या, असा समज शिधावाटप दुकानदारांचा होता. या वस्तू स्वतंत्रपणे दुकानात येणार आहेत. त्या दुकानदाराने पिशवीत टाकून लाभार्थीला द्यायच्या आहेत, अशी माहिती आता शिधावाटप दुकानादारांना मिळाली आहे. शासनाकडून १०० रुपयांमध्ये दिवाळी भेट मिळणार असल्याने दुर्बल घटकातील नागरिकांनी अद्याप बाजारपेठांमधून दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी केलेले नाही. हे नागरिक दररोज जवळच्या शिधावाटप दुकानात जाऊन दिवाळी कीट आले की म्हणून विचारणा करत आहेत. त्यामुळे शिधावाटप दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे.
साठा ठेवायचा कोठे
शिधावाटप दुकानदारांना नियमित शिधा वाटपाचे काम करुन ‘दिवाळी कीट’ वाटप करण्याचे वाढीव काम करायचे आहे. दुकानात नियमित वाटपाचा धान्य साठा असताना ‘दिवाळी कीट’ ठेवायचे कोठे असाही प्रश्न दुकानदारांना पडला आहे. त्यात पाऊस सुरू आहे. धान्य किंवा कीट साठा उघड्यावर ठेवता येणार नसल्याने येणारा साठा कोठे ठेवायचा असा प्रश्न शिधावाटप दुकानदारांसमोर आहे. काही दुकानांच्यामध्ये पाच हजार लीटर पामतेल आले आहे. काही ठिकाणी रवा, मैदा, चणाडाळ स्वतंत्रपणे येऊन पडला आहे.
अंगठा ठश्यानंतर वाटप
शिधावाटप दुकानात दुर्बल घटकांतील लाभार्थींचे सयंत्रावर अंगठा ठसा चिन्हांकित (थम्ब इम्प्रेशन) करुन मग लाभार्थींना चारही वस्तू एकत्रितपणे द्यायच्या आहेत. एक वस्तू लाभार्थीला देऊन त्यांचे चिन्हांकन केले तर ग्राहकाने चारही वस्तू दुकानातून घेतल्या असाही समज होणार आहे. चारही वस्तू एकत्र लाभार्थीला दिल्या नंतर अंगठा ठसा चिन्हांकित करण्याचे काम शिधावाटप दुकानदाराला करायचे आहे. सध्या दुकानात एकेक वस्तू शासनाकडून पाठविण्यात येते, अशी अडचण दुकानदारांनी सांगितली.
अधिक माहितीसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांना संपर्क केला. ते बैठकीत व्यस्त होते. त्यांच्या स्वीय साहाय्यकाला संपर्क केला. त्यांनी एक तासात कळवितो असे सांगितले. ठाण्याच्या शिधावाटप उपनियंत्रकांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. ”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने गोरगरीबांना दिवाळीपूर्वी गवगवा करुन दिवाळी कीट देण्याचा स्त्युत्य निर्णय घेतला. दुर्बल घटकांमध्ये आनंद पसरला. आता दिवाळी तोंडावर आली तरी या कीटचा पत्ता नाही. एक वस्तू आहे तर दुसरी नाही. या वस्तू एकत्रितपणे द्यावयाच्या असल्याने शिधावाटप दुकानदार एकवस्तू लाभार्थीला देऊ शकत नाही. या सर्व वस्तू एकत्रितपणे दोन दिवसात लाभार्थींना मिळतील यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.” – सदानंद थरवळ, कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना डोंबिवली