ठाणे : मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याचे काम आमचे सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने ६० हजार कोटींचा निधी देऊ केला असून मराठवाड्यासाठी जे शक्य आहे, ते सर्व करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये शनिवारी सायंकाळी मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. रमण गंगाखेडकर यांना मराठवाडा भूषण पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार करीत असलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना दिली. मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत. तसेच मराठवाडा  वाॅटर ग्रीड योजनेसाठी १५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. असा एकूण ६० हजार कोटी रुपयांचा निधी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने दिला आहे. मराठवाड्याचा ‘मागास’ हा शब्द पुसून काढायचा असून त्यासाठीच या भागात प्रकल्प उभारणीसाठी अशाप्रकारचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मराठवाड्यासाठी जे शक्य आहे, ते सर्व करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्ती संग्राम हे भारतीय स्वातंत्ऱ्य  संग्रामातील दैदिप्यमान पर्व आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या प्रत्येक जिल्ह्यांना जिल्हा नियोजन योजनेतून दोन कोटी रुपये निधी दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे स्मृती स्मारकासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. समृद्धी महामार्ग संभाजीनगरला जोडण्यात आला आहे. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याला जोडण्यात येणार असून या महामार्गास मराठवाड्यातील पाच जिल्हे जोडण्यात येणार आहेत. आमच्या मंत्रीमंडळात मराठवाडा विकासासबंधीचे जेवढे विषय आले, त्या सर्वांना आम्ही मंजुरी दिली आहे, असेही ते म्हणाले. मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने भवनासाठी भूखंड देण्याची मागणी करण्यात आली असून तसा प्रस्ताव सादर केल्यास आम्ही त्याला मंजुरी देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तसेच लवकरच जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी योजना सुरु करणार असून त्या योजनेस बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. डॉ. रमण गंगाखेडकर यांना मराठवाडा भूषण हा पुरस्कार देण्यात आल्याने या पुरस्काराची उंची वाढली, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय केळकर, आमदार प्रकाश सोळुंके, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी खासदार आनंद परांजपे, अखिल भारतीय वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज,मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सरकार अल्पमतात असताना तत्कालीन सरकारने मंत्रीमंडळाची बैठक घेऊन नामांतराचे निर्णय घेतले होते. परंतु ते अधिकृत नव्हते. आमचे सरकार आल्यानंतर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव केले. जे करायचे ते ठोस करतो. अर्धवट कामे आम्ही करत नाही. आमचे सरकार आल्यावर  सर्व सण निर्बंध मुक्त केले. यंदा तर गणेशोत्सव दणदणीत साजरा करण्यात आला. घरात बसून कोणाचे पोट भरत नाही. पण काही लोकांना घरात बसण्याची सवय असते. असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde will remove the backwardness of marathwada ysh