ठाणे : आम्हाला दगड म्हणता, पण रामाचे दगड होणे केव्हाही चांगलेच. या दगडांना प्रभू रामचंद्रांचा स्पर्श झाला आहे. म्हणून आम्हाला पाण्यात टाकले तर पाण्यावर तरंगू, पण तुम्हाला पाण्यात टाकले तर लगेच बुडाल असे दगड तुम्ही आहात, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना रविवारी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेनिमित्त ठाण्यात आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘चांगले लोक एकत्र येतात, तेव्हा त्याला वज्रमूठ म्हटले जाते पण, इथे सत्तेसाठी हपापलेले लोक एकत्र आले आहेत, त्यामुळे ही त्यांची ‘वज्रझूठ’ आहे.’’

शिवधनुष्य पेलण्यासाठी मोठे मन लागते. तशा प्रकारचे विचार लागतात आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागते. हे सर्व बाळासाहेब ठाकरे करीत होते. परंतु या गोष्टी गेल्या काही वर्षांत कालबाह्य झाल्या. स्वत:पुरता आणि कुटुंबापुरता विचार सुरू झाला. कार्यकर्त्यांना तुमचे तुम्ही पाहून घ्या, असे सांगितले जाऊ लागले. म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी हे शिवधनुष्य हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्याबरोबरच जनतेच्या अपेक्षांप्रमाणे काम करीत आहोत. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, प्रभू रामचंद्र आणि जगदंबेचे आर्शीवाद आमच्या पाठीशी असल्यामुळेच आम्हाला धनुष्यबाण मिळाले आहे. त्यामुळेच आम्ही येत्या ९ एप्रिलला अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी जाणार असून शरयू नदीवर आरती करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर व्हावे, असे बाळासाहेबांचे स्वप्न होते, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करीत आहेत, असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister shinde challenge to uddhav thackeray amy
Show comments