अंबरनाथ : अंबरनाथ शहराचे हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे धरण असलेल्या चिखलोली धरणाच्या उंची वाढवण्याची योजना सात वर्षांपूर्वी हाती घेण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे आजही धरणाची उंची वाढू शकलेली नाही. त्यामुळे अंबरनाथकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. दरवर्षी अंबरनाथकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागते. त्यामुळे यासाठी वेळीच ठोस पाऊले उचलण्याची मागणी होते आहे. अंबरनाथ शहरासाठी नगरोत्थान अभियान कार्यक्रमांतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना २०१८ साली मंजूर करण्यात आली होती. यात चिखलोली धरणाची उंची वाढवून त्यात अतिरिक्त पाणी साठा करणे अपेक्षित होते. ७१ कोटी रूपयांच्या या योजनेच्या कामाला २०१९ साली सुरूवात झाली. मे २०२० अखेर ही योजना पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. मात्र करोनाची टाळेबंदी आणि इतर तांत्रिक समस्यांमुळे ही योजना रखडली. टाळेबंदीनंतरही निधी आणि इतर अनेक कारणे उंची वाढीच्या आत आली.

धरणाची उंची वाढवण्याच्या कामासाठी धरण पूर्ण रिकामे करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या काही वर्षात अनेकदा धरण रिकामे होण्यास वेळ लागतो. काही वर्षांमध्ये धरण रिकामे करण्यास विरोध झाला होता. शहरात पाणीटंचाईच्या झळा बसत असताना धरण रिकामे करण्याच्या निर्णयाला सहमती मिळू शकली नाही. त्यामुळे उंची वाढीचे काम रखडले होते. आता या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि धरणाच्या उंची वाढीसाठीच्या ४० कोटींच्या निधीच्या प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव गेली काही वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही वेळेत निधी न मिळाल्याने ही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. परिणामी अंबरनाथकरांना आजही पाणी कपातीला सामोरे जावे लागते आहे.

अंबरनाथ शहराला कुठून किती पाणी

अंबरनाथ शहराला विविध स्त्रोतांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बॅरेज बंधाऱ्यातून ५० दशलक्ष लीटर, एमआयडीसीच्या जांभूळ केंद्रातून २० दशलक्ष लीटर तर चिखलोली धरणातून ६ दशलक्ष लीटर इतके पाणी पुरवले जाते. चिखलोली धरणातून ज्या भागाला पाणी दिले जाते त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे इतर स्त्रोत नसताना किमान चिखलोली धरणाकडून अंबरनाथकरांना आशा आहे.

सध्यस्थिती काय

अंबरनाथ शहरात सध्याच्या घडीला पाणी टंचाईमुळे पाणी कपात लागू करण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्वेत विविध भागांना एक दिवसाआड पाणी दिले जाते आहे. तर अंबरनाथ पश्चिमेतील काही भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे. त्याचवेळी आसपासच्या शहरांमध्ये अशी कोणतीही पाणी कपात नाही. त्यामुळे नागरिकांत संताप आहे.

प्रतिक्रियाः धरणाच्या उंची वाढीच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पावसाळ्यानंतर धरणाच्या उंची वाढीच्या कामाला सुरुवात होईल. – आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ.