नीरज राऊत
तिन्ही हंगामात फळप्रक्रियेवर परिणाम; उत्पादकांसमोर नवे आर्थिक संकट
पालघर जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यात विशेषत: घोलवड भागात जुलै ते सप्टेंबर दरम्यान येणारे चिकूचे उत्पादन अचानक रोडावल्याने येथील भागातील बागायतदारांसमोर समोर नवेच संकट उभे राहिले आहे. चिकूच्या उत्पादनात घट आल्याने येथील शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची वेळ आली असून बागायतदाराने भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
तालुक्यातील सुमारे ३५०० हजार हेक्टर जमिनीवर चिकूची लागवड करण्यात आली आहे. यासाठी घोलवडच्या चिकूला ‘भौगोलिक मानांकन’ही प्राप्त झाले आहे.
घोलवड चिकूला मुंबईसह उत्तर भारतात विशेष मागणी आहे. साधारण जुलै ते सप्टेंबर, डिसेंबर ते फेब्रुवारी आणि मार्च ते जून या तीन हंगामात उत्पादन येत असते. प्रत्येक झाडावरून वर्षांकाठी साधारण शंभर ते अडीचशे किलो चिकू मिळतात. मात्र यंदा जुलै ते सप्टेंबर या हंगामात झाडाला फारच कमी प्रमाणात बाज आला आहे. त्यामुळे चिकूचे उत्पादन साधारण ७० किलोच्या आसपास आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रति झाडामागे किमान सातशे रुपये नुकसान सोसावे लागत असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.
अवेळी पावसामुळे चिकूतील फायटोफ्थोरा नावाचा रोग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शिवारफेरी करून चिकू बागेची पाहणी केली व बुरशीनाशकाची फवारणी त्वरित चिकू झाडांवर फवारणी करण्या मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचबरोबर चिकू बागेमध्ये फळ गळीची समस्या होती तसेच काही बागांमध्ये शेंडा मर रोगाचा प्रादुर्भाव देखील आढळला असल्याचे डहाणू तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी सांगितले.
तोटय़ाचीच ‘मशागत’
* चिकूचा झाडाची खताद्वारे मशागत करणे झाड व परिसराची साफसफाई करणे. झाडाला सिंचन करणे, तसेच फळ तोडणीस लागणारा साधारण खर्च प्रतिकिलो आठ ते नऊ रुपये इतका आहे.
* चिकूच्या वाडय़ांची मशागत करण्यासाठी लागणाऱ्या रोजगाराला टिकून ठेवण्यासाठी बागायतदार पदरमोड करून उत्पादक कामगारांना रोजंदारी देत आहेत. काही ठिकाणी तर चिकू बागांमधील कामगार हे कामाच्या शोधात इतर ठिकाणी निघून गेल्याने मनुष्यबळाची चिंता सतावत आहे.
* पीक विम्याचे कवच खरीप हंगामापुरतेच मर्यादित असून डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे चिकू उत्पादनात घट निर्माण झाली होती, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.
ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास येत्या काही वर्षांत चिकूची झाडे तोडण्याशिवाय येथील बागायतदारांना पर्याय राहणार नाही. या हंगामानंध्ये बागायतदारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने नुकसान भरपाई द्यावी
प्रीत पाटील, चिकू बागायतदार, घोलवड