लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : ‘धर्मवीर’ चित्रपटात खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका साकारणारा अथर्व जयेश वगळ या १४ वर्षीय बाल कलाकाराने शहरात होणाऱ्या वाहतुक कोंडीला कंटाळून ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे वाहतुक शाखेला पत्र लिहून कोंडी सोडविण्यासाठी नियोजन करण्याची विनंती केली आहे. पूर्वी १५ मिनीटांत शाळेत पोहचत होतो. मागील काही महिन्यांपासून दुभाजक बसवून केलेले वाहतुक बदल, कॅडबरी जंक्शन येथे अवजड वाहनांना दिलेला प्रवेश यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे शाळेत पोहचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्याचे अथर्वने पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता नोकरदारांसोबतच शाळेच्या विद्यार्थ्यांनाही वाहतुक कोंडीचा त्रास भेडसावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मागच्या वर्षीच शिवसेनेचे दिवगंत नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बालपणाचा किस्सा दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात श्रीकांत शिंदे यांच्या बालपणाचा अभिनय अथर्व वगळ याने साकारला आहे. अथर्व हा कळवा येथील खारेगाव भागात वास्तव्यास असून तो वर्तकनगर येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचा इयत्ता नववीमधील विद्यार्थी आहे. ठाणे शहरात मागील काही महिन्यांपासून होणाऱ्या वाहतुक कोंडी संदर्भात अथर्वने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त विनयकुमार राठोड यांना पत्र देऊन वाहतुक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासाविषयी लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा-कल्याण रेल्वे स्थानकाजवळ जलवाहिनी फुटली; डोंबिवलीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम, हजारो लीटर पाणी वाया

ठाणे महापालिका आणि वाहतुक शाखेने मुंबई नाशिक महामार्गाने घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहने, बसगाड्या आणि टेम्पोसारख्या मोठ्या वाहनांना माजिवडा चौकात उड्डाणपूलाखालून येण्यास बंदी केली आहे. त्यामुळे येथील वाहने माजिवडा उड्डाणपूलावरून कॅडबरी सिग्नल येथून ‌वळण घेत घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करत आहेत. तसेच माजिवडा चौकात महापालिकेने ठिकठिकाणी दुभाजक बसविले आहेत. यामुळे वाहतुक कोंडी वाढत आहे. पूर्वी १५ मिनीटांत शाळेत पोहचत होतो. आता कोंडीमुळे अर्धा ते पाऊण तास इतका उशीर होत असल्याचे अथर्व याने पत्रात म्हटले आहे. कॅडबरी जंक्शन येथून वळविण्यात आलेल्या जड-अवजड वाहनांमुळे इंधन खर्च आणि प्रदूषणही वाढत आहे. तसेच टेक्सन कंपनी येथील कापूरबावडी-ढोकाळी हा मार्गही बंद झाल्याने वाहन चालकांना हायलँड मार्गे वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावरही वाहनांचा भार वाढल्याचे अथर्व याने पत्रात म्हटले आहे. काही ठिकाणी मेट्रोची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु प्रशासनाकडून येथील लोखंडी मार्गावरोधक काढले नाही. त्यामुळेही कोंडीत भर पडत आहे. प्रशासनाने वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना दिलासा द्यावा असे अथर्वने म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child actor in dharmaveer atharv wagals letter to administration regarding traffic problem mrj