लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट आजपासून चित्रपटगृहात प्रसिद्ध झाला आहे. हा चित्रपट करमुक्त करावा अशी विनंती ‘धर्मवीर आनंद दिघे, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची बालपणाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराने राज्य सरकारकडे केली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही डोळ्यात पाणी घेऊनच बाहेर पडाल असेही तो म्हणाला.

दिनेश विजन निर्मित आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शिक ‘छावा’ या चित्रपट आज, शुक्रवारपासून सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यात आले आहे. चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागील अनेक दिवसांपासून नागरिक या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होते. हा चित्रपट प्रसिद्ध झाल्याने नागरिक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

दरम्यान, हा चित्रपट करमुक्त करावा अशी विनंती बालकलाकार अथर्व वगळ यांनी केली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित ‘धर्मवीर आनंद दिघे – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रसारित झाला होता. या चित्रपटात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भूमिका कळवा येथे राहणारा बालकलाकार अथर्व वगळ याने साकारली होती. अथर्व याच्या भूमिकेनंतर त्यावेळी त्याचे सर्वत्र कौतुक झाले होते. अथर्व वगळ याने आता छावा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर अथर्व वगळ ट्विट करत म्हणाला की, ‘#छावा, निःशब्द.! साक्षात श्री संभाजी महाराजांवर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर अवतरले एवढा भव्यदिव्य सिनेमा बनविला आहे. उत्तम अभिनय, उत्कृष्ट संवाद, विकी कौशलचा लाजवाब अभिनय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहिल्यावर एक विलक्षण अनुभव आणि डोळ्यांत पाणी घेऊनच थेटर बाहेर पडाल. म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वत्र चित्रपट करमुक्त करावा’ अशी विनंती त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रसारित झाला होता. परंतु, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना काही बदल करण्याचे निर्देश दिले होते. काही आवश्यक बदलांनंतर ‘छावा’च्या अधिकृत प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा आहे. त्यानुसार हा चित्रपट आता प्रदर्शित झाला असून नागरिक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.