ठाणे : राज्यातील सर्व शाळेतील मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील सरकारी आणि खासगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जागृकता आणि गोडी निर्माण व्हावी तसेच स्वराज्यासाठी महाराजांनी केलेला पराक्रम आणि दिलेल्या योगदानाची जाणीव व्हावी, यासाठी सीबीएससीच्या शाळांसह हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये छावा हा चित्रपट मोफत दाखवावा अशी विनंती बालकलाकार अथर्व वगळ याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम पहिल्यांदाच पडद्यावर आला आहे. एक विलक्षण अनुभव आणि महाराजांचे प्रेरणादायी संवाद ऐकून अंगावर शहारे येतात. महाराजांनी आपल्या स्वाभिमानासाठी, स्वराज्यासाठी, रयतेसाठी त्याकाळी भोगलेल्या हालअपेष्ठा, यातना पाहिल्यावर प्रेक्षक डोळ्यांत पाणी घेऊनच सिनेमागृहाबाहेर अभिमानाने पडतो आहे. मराठ्यांच्या भव्यदिव्य पराक्रमाचा सुवर्ण इतिहास डोळ्यासमोर ठेवून चित्रपट रुपात एक ऐतिहासिक सुंदर कलाकृती निर्माण करण्यात आली आहे. त्या वेळच्या काळातील महापराक्रमी जिवंत इतिहासातील साक्षात छत्रपती संभाजी महाराज पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर साक्षात अवतरले असल्याचा भास चित्रपट पाहताना होतो. हा सिनेमा मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी धाडस करून आपला जीव ओतून बनविला आहे.

तसेच आजकाल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक सोडून, दिल्ली बोर्डाच्या ‘सीबीएसई’ आणि ‘आयसीएसई’ इंग्रजी माध्यमांच्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत इतिहासाच्या पुस्तकात फक्त एक ते दोन पानाचा इतिहास समाविष्ट करून शिकवला जातो. त्यामुळे आपला इतिहास किती प्राचीन, मोठा आणि भव्यदिव्य पराक्रमी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी राज्यातील सर्व शाळेतील मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील सरकारी, खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवण्यासाठी विशेष उपाययोजना करावी, अशी विनंती बालकलाकारा अथर्व वगळ याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावडे निवेदनाद्वारे केली.

दरम्यान, छावा” चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विकी कौशल यांना ‘कला क्षेत्रात’ उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने “महाराष्ट्र भूषण” तर, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना ‘विशेष पुरस्कार’ देऊन येत्या १ मे “महाराष्ट्र दिनी” सन्मानित करावे, अशी विनंती ही अथर्व याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Story img Loader