कल्याण – येथील पूर्व भागातील कैलासनगर भागात एका बेकायदा बांधकामासाठी खोदण्यासाठी आलेल्या खड्ड्यात पडून एका १२ वर्षांच्या मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात नेवाळी जवळ रस्ते कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेत आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. ठेकेदार, बेकायदा बांधकाम करणारे भूमाफिया यांच्या निष्काळजीपणाचे हे बळी आहेत, अशी टीका रहिवाशांनी केली.
हेही वाचा – ठाणे : लाचेप्रकरणी जलसंधारण अधिकारी ताब्यात
हेही वाचा – डोंबिवलीतील व्यावसायिकाला ठार मारण्याची शिर्डीतील दोन भावांची धमकी
कल्याण पूर्वेतील कैलासनगरमधील रियान शेख (१२) हा मुलगा बेकायदा इमारत उभारणीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याच्या भागात खेळत होता. खड्ड्यामध्ये पाणी होते. खेळताना चेंडू खड्ड्यात पडल्याने रियान चेंडू काढण्यासाठी खड्ड्यात उतरला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी रियानचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. हा खड्डा खोदणाऱ्या भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. पालिका अधिकारीही या प्रकाराला तितकेच जबाबदार आहेत, असा आरोप रहिवाशांनी केला.