लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील शिळफाटा रस्त्यावरील गोळवली भागातील रिजन्सी अनंतम या गृहसंकुलातील प्ले झोनमध्ये खेळत असताना मंगळवारी संध्याकाळी एका पाच वर्षाच्या मुलाचा अचानक खाली पडून मृत्यू झाला. या मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. सक्षम उंडे (५) असे मरण पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, उंडे कुटुंबीय रिजन्सी अनंतम गृहसंकुलात राहते. सोसायटीच्या आतील भागात मुलांच्या मनोरंजनासाठी प्ले झोन आहे. विविध प्रकारचे खेळ प्रकार येथे आहेत. संध्याकाळच्या वेळेत गृहसंकुलातील मुले येथे दररोज खेळण्यासाठी येतात.
आणखी वाचा-ठाणे : प्रेमसंबंधास नकार दिल्याने महिलेला जिवंत जाळले
मंगळवारी संध्याकाळी सक्षम आपल्या कुटुंबीयांसमवेत प्ले झोनमध्ये खेळण्यासाठी आला होता. खेळत असताना अचानक तो जमिनीवर पडला. तो पडल्याचे पाहताच तेथील कामगाराने तात्काळ सक्षम जवळ जाऊन त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. तो उठत नसल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा मानपाडा पोलीस तपास करत आहेत.