वसई : वसई-विरार महापालिकेच्या ओमनगर येथील तरणतलावात बुडून आठ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी तरणतलावाच्या प्रशिक्षक, कंत्राटदारासह चौघांना अटक केली आहे.
वसईतील एच प्रभागातील अंबाडी नगरच्या ओमनगर येथे महापालिकेचा तरणतलाव आहे. नियमित सदस्यांसह शुल्क भरून नागरिक येथे पोहोण्यासाठी येत असतात. त्याचे शुल्क प्रतिदिन ५० रुपये होते. वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील रिगल हाईटसमध्ये राहणारा युग लाडवा हा ८ वर्षांचा मुलगा रविवारी पोहोण्यासाठी आला होता. संध्याकाळी त्याचे वडील त्याला तरणतलावात सोडून गेले. ते संध्याकाळी ७ वाजता त्याला घेण्यासाठी आले, तेव्हा तो तरणतलावात दिसला नाही. तिथे असलेल्या प्रशिक्षकांना विचारले असता त्यांनीही मुलाबद्दल काही माहिती नसल्याचे बेजबाबदारपणे सांगितले. काही वेळाने युग पाण्यावर तरंगताना आढळला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला त्वरित एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. माणिकपूर पोलिसांनी सुरुवातीला हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र सखोल चौकशीनंतर प्रशिक्षक राहुल टोके, प्रशिक्षक बाळकृष्ण शर्मा यांच्यासह चौघांवर भारतीय दंडविधानसंहितेच्या कलम ३०४ (अ) अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कसा झाला ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आम्ही चार आरोपींना अटक केली असून पालिकेकडून खुलासा मागवल्याचे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले, तसेच कंत्राटदारासह चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युग हा तिसरीत शिकत होता. सोमवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मला तरणतलावातील प्रशिक्षकांनी सुरवातील दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप युग लाडवाचे वडील सुरेश लाडवा यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
या दुर्घटनेस केवळ प्रशिक्षक आणि ठेकेदार जबाबदार नसून पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. मंगळवारी शिवनेसेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त बी. जी. पवार यांची भेट घेतली आणि या प्रकरणात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना जबाबदार धरून निलंबनाची मागणी केली.