|| भाग्यश्री प्रधान
महापालिकेची ऐन वेळी धावपळ; खासगी शाळांतून विद्यार्थ्यांची कुमक
पंडित राम मराठे संगीत महोत्सवाकडे ठाण्यातील प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने येथील सांस्कृतीक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली असताना ठाणे महापालिकेमार्फत सोमवारपासून आयोजित करण्यात आलेल्या बालनाटय़ महोत्सवातही गडकरी रंगायतनचे सभागृह रिकामे होते. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रशासनाला ऐन वेळी खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेक्षक म्हणून पाचारण करण्याची नामुष्की पत्करावी लागली.
ठाणे शहरात महापालिकेमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी डिसेंबरअखेरीस महापालिकेमार्फत आयोजित करण्यात येणारा पंडित राम मराठे संगीत महोत्सव हा याच प्रयत्नांचा एक भाग मानला जातो. सलग पाच दिवस आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाकडे यंदा ठाणेकर रसिकांनी पाठ फिरवल्याने पुढील वर्षांपासून हा महोत्सव तीन दिवसांपुरताच सीमित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने जवळपास पक्का करत आणला आहे. असे असताना सोमवारपासून आयोजित करण्यात आलेल्या बालनाटय़ महोत्सवाकडेही रसिकांनी पाठ फिरवल्याने महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
बाल रंगभूमीची चळवळ सुरू राहावी आणि लहान शहरातील विविध नाटय़संस्थांचा सहभाग या महोत्सवात असल्याने सांस्कृतिक विभागामार्फत विशेष निधी राखीव ठेवण्यात येतो. सोमवारी या महोत्सवामध्ये सिद्धेश बागवे आणि शंकर बापु धुलगडे दिग्दर्शित ‘लहान मुलांची बाप गोष्ट’, करिश्मा वाघ दिग्दर्शित ‘मोगलीच्या जंगलात मोटू पतलु’, संदीप गचांडे दिग्दर्शित ‘चॉकलेटीचे झाड चेटकीणीची धाड’, राजेश राणे दिग्दर्शित ‘संगपोन’ यतिन माझिरे दिग्दर्शित ‘आकार’ आणि वैभव नारकर दिग्दर्शित ‘थेंबाचे टपाल’ ही बालनाटय़े सादर करण्यात आली.
या नाटकांमध्ये सामाजिक विषयांवर लहान मुलांना समजेल अशा पद्धतीने भाष्य करण्यात आले. मात्र सादरकर्ते कलाकर आणि त्यांचे पालक यांच्या व्यतिरिक्त नाटय़गृहात बालप्रेक्षकांची उपस्थिती नव्हती. नाताळच्या सुट्टीत अनेक जण गावी किंवा पर्यटनासाठी जातात. त्यामुळे प्रतिसाद नसल्याचे मत या नाटकांच्या दिग्दर्शकांनी व्यक्त केले. तर बालरंगभूमी जिवंत राहावी व यातूनच चांगले कलाकार उदयास यावे यासाठी पालिकेने राबविलेला हा उपक्रम स्त्युत्य असल्याचे मत कलाकरांच्या पालकांनी व्यक्त केले.
अपुऱ्या प्रसिद्धीचा फटका
महोत्सवाकडे रसिकांनी पाठ फिरविल्याने प्रशासनाला ऐन वेळी ठाण्यातील काही खासगी शाळांकडे धाव घ्यावी लागली. या शाळांमधील लहान मुलांना नाटय़गृहात प्रेक्षक म्हणून आणण्यात आले. त्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडे महापालिका अधिकाऱ्यांना आर्जव करावे लागले. महोत्सवाला पुरेशी प्रसिद्धी देण्यात न आल्याने फटका बसल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.