पूर्वप्राथमिक विभागात दिले जाणारे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असते, कारण हे शिक्षण त्याच्या आयुष्यभराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. बालस्वातंत्र्याची जपणूक करीत, वास्तव अनुभवाच्या विपुल संधी देऊ करणारी, शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण देणारी शाळा ही खरी शाळा असते. ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्वप्राथमिक विभाग, सौ. आनंदीबाई जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पूर्वप्राथमिक विभाग या दृष्टीने प्रयत्नशील असलेल्या शाळांपैकी मान्यवर शाळा आहेत. आज या शाळांनी हसतखेळत शिक्षण पद्धतीचा अवलंब करून बालकांच्या सर्वागीण वाढीच्या दृष्टीने हितकारक अशा पोषक वातावरणनिर्मितीचा वास्तवात यशस्वीपणे वापर केला आहे.
मुलांची लहान वयातच रंगीबेरंगी पुस्तकांशी दोस्ती व्हावी, पुस्तकांच्या जगात त्यांनी रमावे आणि वाचनाची गोडी लागावी म्हणून या शाळेत बालवाचनालयाचा उपक्रम माजी मुख्याध्यापक रोहिणीताई रसाळ यांनी सुरू केला. पालकांनी मुलांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला दिलेल्या पुस्तकांमधून हे बालवाचनालय उभे राहिले आहे. लहान गटामधील मुलांचे पालक स्वत: येऊन पुस्तकाची निवड मुलाला बरोबर घेऊन करतात. इथे पालकांनी मुलाला जवळ घेऊन घरी पुस्तकाचे वाचन करावे जेणेकरून दोघांमध्ये दुवा निर्माण होईल, संवाद वाढीस लागेल आणि वाचनसंस्कार होतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे साडेतीन वर्षांपासूनच मुलाची पुस्तकाशी ओळख होते. पुस्तक घरी न्यायचे, ते नीट वापरायचे, न फाडता परत करायचे, परत केल्यावर नवीन पुस्तक मिळते हे संस्कार आपोआप होतात.
मोठय़ा गटाबाबत मात्र शिक्षिका आणि मुले मिळून बालवाचनालयाचा आनंद घेतात. वर्गशिक्षिकेकडे प्रत्येक मुलाचे कार्ड असते आणि शिक्षिका ठरलेल्या दिवशी मुलाने पुस्तक बदलण्यासाठी आणले की त्याच्या आवडीनुसार नवीन पुस्तक देते. लहान गटामध्ये एका ट्रेमध्ये ८० पुस्तके ४० मुलांसाठी ठेवली जातात, तर मोठय़ा गटात १०० पुस्तके असतात. दर सहा महिन्यांनी ट्रे बदलले जातात. अशा तऱ्हेने लहान गटासाठी मोठी चित्रे आणि वाक्ये कमी तर मोठय़ा गटासाठी रामायण, महाभारत, थोर नेते, बोधपर इसापनीती, हितोपदेश, जादूच्या गोष्टी, इ. विविध विषयांवरील पुस्तके आहेत. साधारणपणे वर्षांला ९०० पुस्तके दोन्ही गटांसाठी उपलब्ध असतात.
मुख्याध्यापक रती भोसेकर सांगतात की, ‘दोन शिक्षिकांकडे बालवाचनालयाची जबाबदारी सुपूर्द करण्यात येते. प्रत्येक पुस्तकावर दाखल क्र., पुस्तक क्र. घातलेला असतो. वर्षअखेरीस आढावा घेतला जातो. जी पुस्तके बाद करायची असतील त्याविषयी निर्णय घेऊन नवीन पुस्तके समाविष्ट करण्यात येतात.’
सौ. आनंदीबाई जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पूर्वप्राथमिक विभागातदेखील वाचनसंस्कार होण्याच्या दृष्टीने बालवाचनालयाचा उपक्रम राबवला जातो. छोटय़ा गटातल्या मुलांना पुस्तकाची आवड निर्माण व्हावी म्हणून रंगीबेरंगी पुस्तके हाताळायला दिली जातात. आधी शिक्षिका पुस्तके हातात घेऊन पुस्तकांची ओळख करून देते. पुस्तकातली विविध चित्रे, पशू-पक्षी दाखवून गोष्टी सांगते, पुस्तकाविषयी संवाद साधते. पुस्तके कशी धरायची, पाने कशी उलटायची, पुस्तक कसं नीट वापरायचं, फाडायचं नाही हे शिक्षिका समजावून देतात. मुलांना पुस्तक हाताळायला मिळतात आणि मग त्यांना हळूहळू पुस्तकांची गोडी लागते.
मोठय़ा शिशूमध्ये प्रारंभी वर्गशिक्षिका मुलांना गोष्टी वाचून दाखवते. महिन्या-दोन महिन्यांनंतर मग मुलांना हातात गोष्टीचं पुस्तक दिलं जातं जे स्वत: शिक्षिकेकडे असतं. या मुलांनादेखील वारंवार पुस्तके चाळायला, हाताळायला दिली जातात, जो मुलांना आनंद देणारा अनुभव असतो. शिक्षिका हातातल्या पुस्तकाची नीट माहिती देते. पुस्तकाचे मुखपृष्ठ, त्यावरील गोष्टीचे नाव, लेखकाचे नाव अशी माहिती देते. पुस्तकातील चित्रे, गोष्टीचे स्वरूप याविषयी संवाद साधते आणि मग गोष्ट वाचून दाखवते. मुलांना हातात पुस्तक घेऊन शिक्षिकेबरोबर गोष्ट वाचायचा एक वेगळा अनुभव मिळतो. ते स्वत: वाचायचा प्रयत्न करतात. टीचरबरोबर संवाद साधताना प्रश्नोत्तर स्वरूपात माहितीचे आदानप्रदान होते. या विभागातील वाचनालयामधील पुस्तकांचा संग्रह पाहण्यासारखा आहे.
भाज्या, पशू, पक्षी, झाडे असा विषय शिकवण्यासाठी मोठय़ा लांब आकाराची ठळक चित्रे असलेली सुंदर पुस्तके इथे आहेत. या विषयाशी निगडित शब्द लिहिलेली कार्डे तयार करून तीही दाखवली जातात. आपले मदतनीसविषयक चित्रांचे पुस्तक, नंतर अशी कार्डे दाखवून मुलांचे वाचन, श्रवण, संवादकौशल्य विकसित केले जाते. मूल्यशिक्षण गोष्टीच्या माध्यमातून करणारी पुस्तके अतिशय परिणामकारक ठरतात असे अनुभवास येते, असे शिक्षिका सांगतात. पूर्वप्राथमिक विभागप्रमुख मेघना मुळगुंद म्हणतात की, पुस्तकं चाळायला देणे, शिक्षिकेसोबत वाचणे यांमधून मुले पुस्तकांबरोबर जोडली जातात, त्यांना चांगल्या सवयी लागतात. अनुभवविश्व समृद्ध होते.