जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे जिल्ह्यात बाल कामगारांची शोध मोहीम सुरु आहे. या अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंब्रा येथील छोट्या कारखान्यांमध्ये आणि उल्हासनगर येथील कपड्याच्या दुकानात धाड टाकून एकूण सात बालकामगारांची सुटका केली आहे. यात तीन मुली आणि चार मुलांचा समावेश असून ही सर्व मुले ही १५ ते १८ वयोगटातील आहे. बालकामगार आढळून आलेल्या संबंधित आस्थापना मालकांवर कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्ह्यात १३ जून ते २० जून या आठ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात बालकामगार शोधमोहीम तसेच बालमजुरी विरोधात जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात ज्या ठिकाणी बालकामगार आढळून येण्याची दाट शक्यता आहे अशा काही ठिकाणांची यादी तयार करण्यात आली होती. तसेच नागरिकांना विविध आस्थापना, कारखाने, उपहारगृह, वाहन दुरुस्तीची दुकाने, वीटभट्टी यांसारख्या विविध ठिकाणी बालकामगार आढळून आल्यास त्याची माहिती देण्यासाठी ०२२-२६५७२९२९ हा संपर्क क्रमांक देखील जाहीर करण्यात आला आहे. या संपर्क क्रमांकाद्वारे काही सजग नागरिकांनी बाल संरक्षण विभागाला मुंब्रा येथील आईस्क्रीम तसेच कागदी ताट बनविणाऱ्या कारखान्यात आणि एका उपहारगृहात बालकामगार असल्याची माहिती दिली.

या माहिती नुसार बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी या दोन्ही कारखान्यांवर धाड टाकून पाच मुलांची सुटका केली. यात तीन मुली आणि एक मुलगा कागदी ताट बनविण्याच्या कारखान्यात काम करताना आढळून आले. तर एक मुलगा आईस्क्रीम बनविणाऱ्या कारखान्यात तर दुसरा मुंब्र्यातील एका उपहार गृहात काम करताना आढळून आला. अशाच पद्धतीने चाईल्ड लाईन या संस्थेतर्फे उल्हासनगर येथील कपड्याच्या दुकानात एक अल्पवयीन मुलगा काम करत असल्याची माहिती बालसंरक्षण विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने दुकानावर धाड टाकून त्या मुलाची सुटका केली. या मोहिमेत आढळून आलेले सर्व बालकामगार हे १५ ते १८ वयोगटातील आहे.

या मुलांना पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी ही मुलं आढळून आली आहेत तेथील मालकांवर कायदेशीर रित्या गुन्हे दाखल करण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी दिली आहे.

Story img Loader