कचरा वेचण्याच्या कामानेच त्यांना बहुमान मिळवून दिला आणि ‘त्या’ चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव प्रकटले. ‘अनुबंध संस्थे’च्या वतीने कल्याण येथील क्षेपणभूमीजवळील (डम्पिंग ग्राऊंड) साठेनगर या परिसरात एक आगळावेगळा कौतुक सोहळा झाला.
डिसेंबर महिन्यात ठाणे येथे झालेल्या ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या ‘वंचितांच्या रंगमंचावर’ या कार्यक्रमात साठे नगरमधील चिमुकल्यांनी ‘जीना इसी का नाम है’ हे नाटक सादर करून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवली होती. या एकांकिकेच्या माध्यमातून या मुलांनी त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना, समाजाची अवहेलना उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल अनुबंध संस्थेनेही त्यांचा सन्मान केला. या वेळी व्यासपीठावर हे चिमुकले विराजमान होते. तर त्यांच्या समोर संस्थेच्या प्रा. मीनल सोहनी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उदय सामंत, डिंपल दहीफुले, सुनील चव्हाण, भास्कर शेट्टी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या आगळ्या वेगळ्या कौतुक सोहळ्याचे आश्चर्य या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. कचरा वेचक वस्तीतही अनेक हिरे आहेत. त्यांना शोधण्याचे काम संस्थांनी करून त्यांना पैलू पाडावेत. अशा पद्धतीने त्यांचेही जीवन चमकून निघेल आम्ही हे कार्य करत राहणार असून समाजानेही आमच्या पाठिशी उभे राहावे असे आवाहन संस्थेने केले.
कलाकार घडावे!
वंचित समाजातच अनेक हरहुन्नरी कलाकार दडलेले असतात. त्यांना शोधून कलागुणांना वाव देणे गरजे आहे. ते काम आम्ही करत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे, असे मत संस्थेने व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा