मानसी जोशी, पूर्वा साडविलकर
ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील अनेक शाळांच्या परीक्षाही अद्यापि संपल्या नसल्या तरी, या शहरांतील छोटे रंगकर्मी मात्र उन्हाळी सुट्टीतील बालनाटय़ांचा हंगाम गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तिन्ही शहरांतील नाटय़गृहांच्या एप्रिल ते जूनपर्यंतच्या बहुतेक तारखांची पूर्वनोंदणी बालनाटय़े सादर करणाऱ्या संस्थांनी केली आहे.
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, कल्याण-डोंबिवलीतील आचार्य अत्रे नाटय़गृहाच्या तारखा सादरीकरणासाठी आधीच आरक्षित करून ठेवल्या आहेत.
गडकरी रंगायतनमध्ये एप्रिलमध्ये सात, मेमध्ये बारा आणि जूनमध्ये पाच बालनाटय़ांचे प्रयोग होणार आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात मे महिन्यात सात प्रयोग होतील, तर आचार्य अत्रे नाटय़गृहात तीन महिन्यांत मिळून एकूण सहा बालनाटय़ांचे प्रयोग होणार आहे. अत्रे नाटय़गृहातील मे महिन्यांच्या चारही रविवारची बालनाटय़ांसाठी पूर्वनोंदणी झाली आहे. दोन्ही सत्रांत बालनाटय़ सादर होणार असल्याचे नाटय़ व्यवस्थापकांनी सांगितले.
या नाटकांचा समावेश
जंतरमंतर पोरं बिलंदर, नवे गोकुळ, बँक ऑफ बालपण, रडका राक्षस, झाली काय गंमत, पक्ष्यांची पिकनिक, चक्रमांचे विक्रम, मिकीमाऊस हरवला, ससोबा रॉकेटवाले, नकटी चेटकीण-चकणा राक्षस, बालवाडीचे बच्चमजी, भीम झिंदाबाद, कल्लू कलाकार आणि मर्यादा पुरुषोत्तम या विषयावरील बालनाटय़े यंदा लहान मुलांच्या भेटीला येणार आहेत. या वेळेस बालनाटय़ातून सामाजिक संदेश दिला जाणार आहेत.
महान व्यक्तींची चरित्रे, मुलांच्या समस्या आणि पालकांची मानसिकता हे विषय बालनाटय़ातून मांडण्याची गरज आहे. सोप्या भाषेतून बालनाटय़ सादर होणे गरजेचे आहे.
– डॉ. अरुंधती भालेराव, संचालिका, प्रारंभ कला संस्था, ठाणे</p>
ठाण्यातील नाटय़गृहांमध्ये बालनाटय़निर्मिती संस्थांकडून प्रयोगांकरिता पूर्वनोंदणी केली जात आहे. एकूणच बालनाटकांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे.
– विवेक जोशी, नाटय़गृह व्यवस्थापक, ठाणे महापालिका