पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील पोटखळवाडीत कुपोषण पाचवीला पुजलेले. शिक्षणाचा गंध नाही आणि प्रत्येकाच्या घरात अठरा विशे दारिद्रय़. त्यामुळे वाडीत दुसऱ्या तिसऱ्या श्रेणीतील कुपोषणग्रस्त मुलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झालेली. यंदा मात्र या वाडीत एक बदल घडला. रहिवाशांनी दारिद्रय, कुपोषण आणि निरक्षरता या तीनही शत्रूंना नामशेष करण्याचा निर्धार केला.
मुंबईस्थित ‘नवदृष्टी’ या संस्थेच्या मदतीने ही कामगिरी त्यांनी पार पाडली.
वाडीत गेल्या जुलै माहिन्यात एक ते पाच वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी तेथीलच शांताराम आणि प्रमिला गोरखणे या दाम्पत्याने अंगणवाडी सुरू केली. रोज दुपारी तीन ते सहा अशा वेळेत आठवडय़ाच्या सातही दिवस वाडीतील मुले-मुली अंगणवाडीत आणून त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, या उद्देशाने दोघांचे काम सुरू झाले.
सध्या अंगणवाडीत मुलांना सोयाबीन, मूग, उडीद, नाचणी आणि तांदळाच्या मिश्रणाचा उपमा, शिरा आणि डोसा हे खाद्यपदार्थ दिले जातात. दर रविवारी फळांचा रस दिला जातो. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील मुले कुपोषणमुक्त झाली. मुलांवर स्वच्छतेचेही संस्कार केले जातात. यासाठी शरीराची स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेचे धडे दिले जातात. आता येथील रहिवाशांनी ऑक्टोबरमध्ये कुटुंबकबिल्यासह वीटभट्टय़ांवर कामाला जाण्याऐवजी वाडीत राहून मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. सध्या काही कुटुंबे आपल्या मुलांना वाडीतच ठेवून वीटभट्टय़ांवर कामावर जातात. त्यामुळे डिसेंबपर्यंत ही अंगणवाडी सुरू राहू शकली. अंगणवाडीत २५ मुला-मुली असतात.
गावचे सरपंच, पोलीस पाटील आदींनीही या अंगणवाडी प्रकल्पाला मदत केली. पुढील वर्षी पुन्हा पावसाळ्यात या वाडीत अंगणवाडी सुरू करून ती अधिक काळ सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. नागेश टेकाळे यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा