आ पण बालपणच्या अनेक रम्य आठवणी आपल्या मुलांना सुटी लागल्यावर त्यांच्याबरोबर पुन्हा नव्याने अनुभवतो (किंवा आपला अनुभव त्यांना देऊ पाहतो). सुटी लागल्यावर हातात पुस्तक घेऊन, आरामात लोळत तासन्तास वाचण्याची मजा (आणि तेही आईच्या हाकांकडे लक्ष न देता) आपल्या पिढीने मनसोक्त अनुभवली आहे. अगदी परीकथा, जादूच्या कथा, गोटय़ा, फास्टर फेणे यांच्यापासून शिवाजी महाराजांपर्यंत अनेक व्यक्तिरेखा वेळोवेळी भेटत गेल्या आणि आपले बालविश्व समृद्ध करीत गेल्या. त्या जडणघडणीच्या काळात कळत-नकळत चांगल्या आचार-विचारांचे संस्कार या वाचनाने सातत्याने केले. त्याचबरोबर मराठी भाषेविषयी, त्यातील लिखाणाविषयी, लेखक/ कवींविषयी आत्मीयता निर्माण करताना भाषा ही अतिशय चांगली केली. सध्याच्या मुलांना हा ‘वाचू आनंदे’चा समृद्ध अनुभव देण्याच्या व्यापक उद्देशाने नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे बालवाचनालयाचा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
नाशिकमध्ये ७ फेब्रु. २०१५ रोजी या उपक्रमाचे उद्घाटन झाले आणि सध्या ९० बालवाचनालयाच्या पेटय़ांचा लाभ मुले सुटीत घेत आहेत. या उपक्रमांतर्गत खास मुलांसाठी १५ मराठी आणि १० इंग्रजी पुस्तकांच्या पेटय़ा तयार करण्यात आल्या आहेत. पुस्तकपेटीसाठी जे देणगीमूल्य आकारले जाते त्याला ‘८० जी’अंतर्गत सवलत प्राप्त होते. विशेष म्हणून त्यानंतर त्या पेटीतल्या पुस्तकांवर देणगीमूल्य देणाऱ्या मुलाचे नाव लिहिले जाते. मुलांसाठी हा एक वेगळाच अनुभव असतो. साधारणपणे २ महिन्यांनंतर मुलांना दुसरी पेटी मिळते आणि अशा तऱ्हेने साखळी सुरू राहते. सध्या दुसरी ते सातवीच्या मुलांच्या वयोगटासाठी या पेटय़ा तयार करण्यात आल्या आहेत. पुढील वयोगटासाठीचे काम सुरू आहे. नाशिक, ठाणे, पुणे, मुलुंड, भांडुप इ. ठिकाणी या पुस्तकपेटय़ा उपलब्ध आहेत आणि अल्पावधीतच या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला आहे. वाचनासाठी मुलांना प्रवृत्त करताना या योजनेचे शिल्पकार विनायक रानडे किती बारकाईने विचार करतात ते प्रकर्षांने जाणवते आणि त्यातच त्यांच्या यशाचे रहस्यही दडलेले आहे. समाजात वाचनसंस्कृती वृद्घिंगत करण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे रानडे यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही अभिनव योजना यशस्वीपणे राबविली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाबाहेरही या योजनेला यश प्राप्त झाले आहे. नुकत्याच १० पेटय़ा जपानमध्ये (टोकियो) गेल्या आहेत. हे विशेषत्वाने नमूद करण्याजोगे! पण इथेच न थांबता पुढे माझं ग्रंथालय (दोन्ही मोठय़ांसाठी) आणि बच्चे कंपनीसाठी माझं ग्रंथालय (बालविभाग) असे या योजनेचे कार्यक्षेत्र विस्तारत आहे, वाचनसंस्कृती फोफावत आहे.
बालवाचकांसाठी एका छोटय़ा दप्तरवजा सुबक पिशवीत ही पुस्तके उपलब्ध आहेत. त्यावर मध्यभागी माझं ग्रंथालय (बालविभाग) असे शीर्षक असून, कोपऱ्यात साहित्यिक कुसुमाग्रज यांचे चित्र आहे. रंगीबेरंगी, आकर्षक अशी नवी कोरी पुस्तके वाचण्याचा अनुभव मुलांना दर दोन महिन्यांनी मिळतो. शिवाय कोणत्याही वेळेला आवडेल ते पुस्तक निवडण्याचे स्वातंत्र्यही प्राप्त होते. कळत-नकळत आपली पुस्तके नीट, काळजीपूर्वक वाचण्याची, नीट परत पिशवीत ठेवण्याची सवय लागते. शहरातल्या सुस्थितीतल्या मुलांना देवाणघेवाण करण्याची सवय आपोआप लागते. या निमित्ताने मुले आणि पालक एकत्र येतात, संपर्क वाढतो, संवाद सुरू होतो, विचारांची/ अनुभवांची देवाणघेवाण होते. छोटी कुटुंबे विस्तारू लागतात, नवी नाती निर्माण होतात. बऱ्याच ठिकाणी पालक मोठय़ांच्या पुस्तकपेटीशी जोडले जात आहेत. (युवा गटासाठीदेखील पुस्तकनिवडीचे काम सुरू आहे.)
या पेटय़ा तयार करताना मुलांना गोडी निर्माण होईल, वाचनाकडे ती आकृष्ट होतील याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे अभ्यासाशी निगडित (गुणांमध्ये रूपांतर करणारी) पुस्तके या टप्प्यावर समाविष्ट न करता मनोरंजन करताना अनुभवविश्व समृद्ध करणारी पुस्तके निवडण्यात आली आहेत. ७५ गोष्टी श्रीकृष्णाच्या, गणेशाच्या अद्भुत गोष्टी, धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्फूर्तिकथा, शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा याचबरोबर प्रेमळ भूत, संपूर्ण अरेबिअन नाइटस्, अलिफ-लैला, इ. वैविध्यपूर्ण पुस्तकांचा समावेश या पेटय़ांमध्ये आहे. अनुवादित, आत्मकथनपर, विनोदी, साहस कथा इ. पुस्तकेही मुलांना वाचता येणार आहेत. नाशिकमध्ये या योजनेंतर्गत खास मुलांसाठी पाककृती (तेलविरहित), कार्टून्स इ. विषयांवर कार्यशाळा आयोजिण्यात आल्या होत्या. या पुस्तकांबरोबर ‘माझं मत’ अशी अभिप्राय वही या पेटीत खुबीने समाविष्ट करण्यात आली आहे. जेणेकरून मुले वाचण्यास प्रवृत्त होतील.
आपल्या ठाण्यात १६ एप्रिलला या योजनेस सोळा पेटय़ांनी प्रारंभ झाला आणि आता ३२ पेटय़ा आहेत. पहिली पेटी झवेणी ठाणावालाच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात देण्यात आली आहे. समाजात झपाटय़ाने कमी होणाऱ्या वाचनसंस्कृतीविषयी होणाऱ्या चर्चेत न अडकता वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या अभिनव उपक्रमात कुसुमाग्रज प्रतिष्ठानने यश प्राप्त केले. विशेष म्हणजे सर्व वयोगटांसाठी ही योजना राबविण्याची दूरदृष्टी दाखवताना कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेली वाचनसंस्कृती वाढविण्याचे आपले ध्येयही साध्य केले आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. समाजाची गरज लक्षात घेऊन उन्हाळी सुट्टीत बालसाहित्याचा खजिना महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम खरोखर स्तुत्यच आहे. त्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि विनायक रानडे यांना मन:पूर्वक धन्यवाद!
ठाणे समन्वयक संगीता राजपाठक- ९८१९५९१६८४
बालसाहित्याचा खजिना!
आ पण बालपणच्या अनेक रम्य आठवणी आपल्या मुलांना सुटी लागल्यावर त्यांच्याबरोबर पुन्हा नव्याने अनुभवतो (किंवा आपला अनुभव त्यांना देऊ पाहतो). सुटी लागल्यावर हातात पुस्तक घेऊन, आरामात
First published on: 26-05-2015 at 01:23 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children literature