महिलांच्या डोळ्यात मिरची पुड फेकून त्यांच्या गळ्यातील दागिने खेचण्याचा नवा फंडा अवलंबिल्याचे ठाण्यातील एका घटनेतून समोर आले आहे. मात्र, सोनसाखळी चोरांच्या या नव्या फंडय़ामुळे महिलांच्या डोळ्यांना गंभीर इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ठाणे पोलिसांना वाकुल्या दाखवत सोनसाखळी चोरांचा उपद्रव शहरात दिवसाढवळ्या सुरू असल्याने महिलांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. ठाणे, कल्याण शहरांमध्ये गुरूवारी दिवसभरात पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले असून यापैकी एका गुन्ह्यात चोरटय़ांने महिलेच्या डोळ्यात मिरची पुड फेकली आहे.
ठाणे येथील किसननगर भागातील किर्ती वैभव इमारतीत अंडाल यादवर (३७) राहत असून त्या गुरूवारी सकाळी मुलीला शाळेच्या बसमध्ये बसवून घरी येत होत्या. इमारतीचा जिना चढत असतानाच पहिल्या मजल्यावरून धावत आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकली आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचून त्यांना धक्का दिला. त्यानंतर त्याने तेथून पलायन केले. या घटनेप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेच्या निमित्ताने चोरटे सावज टिपण्यासाठी आता इमारतींमध्ये दबा धरून बसू लागले आहेत तर दागिने लुटताना महिलेकडून प्रतिकार होऊ नये म्हणून त्यांच्या डोळ्यात चोरटे मिरची पुड फेकू लागले आहेत. मात्र, या मिरचीपुडमुळे महिलांना इजा पोहचण्याची शक्यता असल्याने महिलांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, ठाणे येथील वाघबीळ परिसरात सरोजीनी चव्हाण (६२) आणि त्यांचे पती गुरूवारी वाघबीळ रोडवरून पायी जात होते. त्यावेळी मोटारसायकवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेली. तर पुष्पम रतनराज (५८) या ओवळा परिसरातून जात असताना मोटारसायकवरून आलेल्या चोरटय़ाने त्याच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचले. शुभदा दळवी (४५) कल्याण बेतूकरपाडा परिसरातून जात असताना चोरटय़ांनी त्यांचे मंगळसुत्र खेचले. तर अग्रवाल कॉलेज परिसरात सुनील मिश्रा यांच्या गळ्यावर थाप मारून चोरटय़ांनी सोनसाखळी खेचून नेली. सोनसाखळी चोरटय़ांकडून नवनवीन फंडे शोधले जात असतानाही पोलिसांकडून मात्र फारशी कारवाई होताना दिसून येत नाही. पोलिसांच्या नाकावर टिच्चून सोनसाखळी चोरांचा उपद्रव शहरात सुरू असल्याचे चित्र आहे.

Story img Loader