ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत पुढील वर्षी होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या वर्गामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेच्या धर्तीवर चाचणी घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यंदा वर्गात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. गेली २९ वर्षे ही संस्था केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षेचे नि:शुल्क मार्गदर्शन करीत आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली जाणारी प्रवेश परीक्षा २६ जून रोजी होईल. २६ जून रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत ठाण्यातील बांदोडकर विज्ञान विद्यालय येथे ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानिमित्त संस्थेच्या वाटचालीचा आणि कार्यपद्धतीचा आढावा..
केंद्र शासनाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रीय टक्का कमी होत चालल्याची ओरड काही आताची नाही. गेली अनेक वर्षे वेळोवेळी निरनिराळ्या व्यासपीठांवरून अशा चर्चा होत असतात. ठाणे महापालिकेच्या महासभेत १९८६ मध्ये अशाच प्रकारची चर्चा झाली. त्यावेळी वसंत डावखरे महापौर तर सुरेश जोशी आयुक्त होते. पुढील काळात खासदार म्हणून यशस्वी कारकीर्द गाजविलेले प्रकाश परांजपे त्यावेळी ठाण्यात नगरसेवक म्हणून कार्यरत होते. याविषयी केवळ चर्चा करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करणारी एखादी प्रशिक्षण संस्था ठाणे महापालिकेने सुरू करावी, असा विचार त्या बैठकीत मांडण्यात आला आणि लगेचच एका वर्षांत तो अमलातही आला. १९८७ पासून दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणी देशमुख यांच्या नावाने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरू झाली. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख आणि बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य एस.जी.गोखले प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून काम पाहू लागले. नंतरच्या काळात सुभाष सोमण, म.मो. पेंडसे यांनी संचालक म्हणून संस्थेचे कामकाज पाहिले. २०१० पासून ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ संस्थेचा कारभार पाहात आहेत.
गेल्या २९ वर्षांच्या कार्यकाळात संस्थेत प्रशिक्षण घेतलेले शंभरएक अधिकारी प्रशासनाच्या निरनिराळ्या सेवांमध्ये कार्यरत आहेत. त्यात सध्या नागपूरचे आयुक्त असणारे श्रावण हर्डिकर, ठाण्यात देदीप्यमान कामगिरी करून आता मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी बदली झालेल्या डॉ. अश्विनी जोशी, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, बिहारमध्ये कर्तबगार पोलीस अधिकारी असा लौकिक असणारे शिवदीप लांडे, उत्तराखंड येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. विजय जोगदंड, हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे जिल्हाधिकारी असलेले ऋग्वेद ठाकूर, नवी दिल्लीत कस्टम विभागात कार्यरत असणाऱ्या अश्विनी अडिवलेकर, आयकर विभागातील कविता पाटील, चिन्मय पाटील, भूपेंद्र भारद्वाज, सुप्रिया घाग आदींचा समावेश आहे.
या प्रशिक्षण केंद्रात विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षा घेऊन केली जाते. दरवर्षी ५०० ते ५५० विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यातून ५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यातील २५ जागा राखीव असतात. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन जुलैच्या तिसऱ्या वर्षी अभ्यासक्रमास सुरुवात होते. प्रत्येकाला येथे दोनदा परीक्षेला बसू दिले जाते. भावी जीवनात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या घटकांचे नीट आकलन व्हावे, यासाठी येथे विशेष प्रयत्न केले जातात. त्यांना इतर कोचिंग क्लासप्रमाणे येथे कोणत्याही विषयाच्या आयत्या नोटस् दिल्या जात नाहीत. त्याऐवजी अभ्यास कसा करावा, याचे तंत्र शिकविले जाते. नियमित सराव परीक्षा घेतल्या जातात.
अद्ययावत ग्रंथालय
प्रशिक्षण केंद्राचे अद्ययावत ग्रंथालय असून त्यात साडेपाच हजारांहून अधिक पुस्तके आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन पाच लाख रुपयांची पुस्तके खरेदी करते. सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत येथील अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली असते. वर्षभरात फक्त धुळवडीचा अपवाद वगळता इतर ३६४ दिवस विद्यार्थ्यांना येथे अभ्यास करता येतो. त्यांना वायफाय इंटरनेट सुविधा विनामूल्य उपलब्ध असते.
फाऊंडेशन वर्ग
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी आकलन व्हावे, म्हणून महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी प्रशिक्षण केंद्रात खास वर्ग घेतले जातात. बारावीत ८५ टक्क्य़ांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्गात प्रवेश दिला जातो.
यंदाच्या परीक्षेविषयी..
२६ जून रोजी होणाऱ्या प्रवेश परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी १५ जूनपर्यंत सकाळी ११ ते ५ या वेळेत हे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पदवी परीक्षा गुणपत्रिका (सर्वसाधारण वर्ग ५५ टक्के व राखीव वर्ग ५० टक्के गुण आवश्यक), अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, दोन स्टॅम्प साइज छायाचित्रे आणि आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा घेण्यात येणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी २ जुलैला सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन २० जुलैला सायंकाळी ५ वाजता अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी वर्तकनगर येथील चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता-चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, तळमजला, नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत, वेदांत शॉपिंग सेंटरसमोर, कोरस रोड, वर्तकनगर, ठाणे (प). दूरध्वनी- २५८८१४२१.