महाविद्यालय हे तरुण विद्यार्थ्यांचे दुसरे घर म्हणावे लागेल. कारण दैनंदिन आयुष्यातील अनेक तास महाविद्यालयात शिक्षण घेत तरुण पिढी आपले भवितव्य घडवत असते. ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत करण्यासाठी महाविद्यालयीन वयात ग्रंथालयाचा सहवास लाभला तर भावी पिढी निश्चितच उच्च प्रगतीच्या वाटेवर प्रस्थान करेल. अभ्यास, मनोरंजन यासोबत इतर ज्ञान आत्मसात करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांची पावले महाविद्यालयातील या ग्रंथालयांकडे वळतात. उल्हासनगरमधील चांदीबाई हिंमतलाल मनसुखानी महाविद्यालयाचे ग्रंथालय गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच  साहित्याची ग्रंथसेवा पुरवत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९६५ मध्ये महाविद्यालयाची स्थापना झाली. सुरुवातीला महाविद्यालयात २५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पूर्वी विद्यार्थ्यांना पुस्तके कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपलब्ध होती. विद्यार्थ्यांना स्वत: पुस्तके हाताळण्याची सोय नव्हती. कालांतराने विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यावर ग्रंथालयाचे स्वरूप बदलले. २०११मध्ये हरेश अर्जुन लखानी मेमोरिअल ग्रंथालय असे ग्रंथालयाचे नामकरण करण्यात आले. सध्या महाविद्यालयातील प्रशस्त जागेत ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान होताना दिसते. विद्यार्थी स्वत: त्यांना हव्या असलेल्या पुस्तकांचा शोध घेऊ शकतात.  ग्रंथालयात प्रवेश केल्यावर ग्रंथप्रणाली पटवून देणारे रंगनाथन यांचे छायाचित्र पाहायला मिळते. प्रशस्त जागा आणि अभ्यासात मग्न असलेले विद्यार्थी यामुळे ज्ञानमंदिरात प्रवेश केल्याचा आनंद अनुभवता येतो. संदर्भ ग्रंथालय आणि देवाणघेवाण, अभ्यासिका असा महाविद्यालयात दोन ग्रंथालयांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो. सध्या ग्रंथालयात एकूण ८२ हजार पुस्तके आहेत. साधारण ४० मासिके ग्रंथालयात असून चार भाषांमधील विविध वृत्तपत्रे ग्रंथालयाच्या आवारात विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तकांची ओळख व्हावी, ग्रंथालयातील कारभार विद्यार्थ्यांना माहिती व्हावा यासाठी ग्रंथालयात मार्गदर्शन शिबीर घेण्यात येते. चांदीबाई हिंमतलाल मनसुखानी महाविद्यालयात सिंधी विद्यार्थी, प्राध्यापक असल्याने महाविद्यालयात सिंधी विषय शिकवला जातो. सिंधी भाषेतील १९३९ सालपासूनची दुर्मीळ पुस्तके महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. शहानोरसालो हा धर्मग्रंथ ग्रंथालयाच्या संग्रही आहे.

विविध विषयांनुसार पुस्तकांची मांडणी ग्रंथालयात केलेली पाहायला मिळते. व्यवस्थापन, गणित, मराठी, इंग्रजी साहित्य, नाटक अशा साहित्यप्रकारानुसार पुस्तके ग्रंथालयाच्या कपाटात पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांना हवी असलेली पुस्तके ते शोधून घेतात आणि नोंदणी करून आठ दिवस पुस्तके विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी उपलब्ध करून दिली जातात. ग्रंथालयात विविध जर्नल्सचा ४५० खंडांचा संग्रह केलेला आहे. अभ्यासक्रमाच्या सीडी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयात ठेवण्यात आल्या आहेत. विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्या समन्वयाने गरजू विद्यार्थी, संशोधकांना ई-बुक्स, ई-जर्नल्स, काही तज्ज्ञ मंडळींचे प्रबंध अभ्यासाकरिता ग्रंथालयातून उपलब्ध करून दिले जातात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेल्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच ग्रंथालयात उपलब्ध होत असतो. स्वतंत्र संदर्भ ग्रंथालय असून विद्यार्थी त्या ठिकाणी बसून संदर्भ ग्रंथांचा लाभ घेऊ शकतात.

ग्रंथालयात सध्या पाच हजार सभासद असून दररोज अडीच ते तीन हजार विद्यार्थी पुस्तकांची देवाणघेवाण करतात. ग्रंथालयातच असणाऱ्या अभ्यासिकेचा आठशे ते हजार विद्यार्थी लाभ घेतात, हे ग्रंथालयाच्या उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण म्हणता येईल.

ग्रंथालयात विद्यार्थ्यांचा समूह अभ्यास करत दिसला तरी रसग्रहण करण्यासाठी पुस्तकांच्या घरात लागणारी शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळते. ग्रंथालयात सध्या २५ कर्मचारी वर्ग कार्यरत असून नीता जोशी या सहाय्यक ग्रंथपाल म्हणून ग्रंथालयात जबाबदारी सांभाळत आहेत.

विनामूल्य इंटरनेट सुविधा

ग्रंथालयातच विद्यार्थ्यांना विनामूल्य इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला २० मिनिटे इंटरनेट सुविधेचा लाभ घेता येईल. इंटरनेटसाठी ग्रंथालयात स्वतंत्र कक्ष आहे.

पुस्तक प्रदर्शन

वाचन संस्कृती रुजावी, विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाचनाची गोडी लागावी यासाठी ग्रंथालयात थोर शास्त्रज्ञांची चरित्रे ग्रंथालयात प्रदर्शनासाठी ठेवली जातात, असे ग्रंथपाल सुभाष आठवले यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chm school library in ulhasnagar