FIR Against Choreographer Remo D’Souza : प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझासह पाच जणांविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रेमो डिसोझावर एका नृत्य समूहाकडून ११.९६ कोटी उकळले असल्याचा आरोप आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. २६ वर्षीय नृत्यिकेने याविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती.

एफआयआरनुसार, “२०१८ ते जुलै २०२४ दरम्यान ही घटना घडली आहे. लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये सहभागी झालेल्या एका नृत्य पथकाने भरीव बक्षिसे जिंकली होती. डिसोझा आणि इतर आरोपींनी स्वतःला संघाचे प्रतिनिधी म्हणून चुकीची माहिती दिली आणि बक्षिसाच्या रकमेवर दावा केला. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या ४६५ (बनावट), ४२० (फसवणूक) यासह कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमप्रकाश शंकर चौहान, रोहित जाधव, विनोद राऊत, रमेश गुप्ता आणि फ्रेम प्रोडक्शन कंपनींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली असून मनोरंजन क्षेत्रातील हाय प्रोफाईल व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.