ठाणे: नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून त्यानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. ठाणे, मुंबई आणि उपनगरातील बाजारात लहान-मोठ्या आकारातील ख्रिसमस ट्री, स्प्रिंग स्टॅण्ड, सांताक्लाॅजचे खास लहान मुलांच्या आकाराचे कपडे, सांताक्लाॅजची प्रतिकृती, चित्र, प्रभू येशू आणि मेरीच्या मूर्ती, घर सजावटीच्या वस्तू, दिव्यांच्या माळा असे विविध साहित्य बाजारात दाखल झाले आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी ख्रिस्त बांधवांची बाजारात गर्दी होऊ लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिसेंबर महिना येताच नाताळ सणाचे वेध लागतात. या सणाच्या साहित्याने बाजारपेठा सजायला लागतात. यंदाही नाताळच्या दोन आठवड्याआधीपासून बाजारात खरेदीची लगबग सुरु होते. यंदाही असेच चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. नाताळनिमित्त घर, चर्च, कार्यालय, गृहसंकुले सजविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. सांताक्लॉजचे प्रतिकृती, मोजे, मुखवटे, टोप्या, खेळणी, बाहुली, ख्रिसमस ट्री, सांताक्लॅाझच्या टोपीचे केसांचे पट्टे, कॅण्डल स्टॅण्ड, चॉकलेट्सचं हँपर बास्केट, आकर्षक पद्धतीने तयार केलेली भेटकार्ड, स्टार्स, चेरी, रीथ, चिनी बनावटीच्या पानांफुलांच्या वेली, झाडे, फळे, ख्रिसमस केक आणि चकाकणाऱ्या विविध प्रकारच्या एलईडी लाइट्स, या सर्व वस्तूंनी बाजारपेठा सजलेल्या आहेत. खास ख्रिसमसनिमित्त सांताक्लाॅझ सारखे लहानमुलांच्या आकाराचे कपडे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या कपड्यांची विक्री १५० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत आहेत. तर, सांताक्लाॅझची साधी टोपी प्रत्येकी १० रुपये तर, विद्यूत रोषणाईची सजावट केलेली टोपी ३० ते ४० रुपयांनी विक्री केली जात आहे.

हेही वाचा… डोंबिवली जीमखाना येथे राम मंदिराची प्रतिकृती; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

सांताक्लॅाझच्या टोपीचे केसाच्या पट्ट्याची विक्री १० ते २० रुपयाने केली जात आहे. तर, घर सजावटीचे साहित्य ही अगदी १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती विक्रेते मनोज बागवे यांनी दिली. ख्रिसमस ट्री देखील सर्व आकारांमध्ये उपलब्ध आहेत. तर, ख्रिसमस ट्रीच्या सजावटीसाठी चिनी बनावटीच्या एलईडी लाइट्स, कागदी आणि मेटलचे चांदणीच्या आकाराचे आकाशकंदील, प्रकाशदिव्यांच्या माळा खेरदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. तसेच नाताळ निमित्त शहरातील दुकानांमध्येही सजावट केली असून विविध वस्तूंच्या खरेदीवर सवलती लावण्यात आल्या आहेत. यामुळे ग्राहकांनाही खरेदी करताना आनंद मिळत आहे.

नाताळनिमित्त मिठाई आणि केक मध्येही विविध प्रकार

मुंबई, ठाणे तसेच उपनगरातील बड्या मिठाईच्या दुकानांमध्ये खास नाताळनिमित्त विविध मिठाई उपलब्ध झाल्या आहेत. तसेच बिस्कीटचे प्रकार ही उपलब्ध आहेत. त्यासह, प्लम केक विविध प्रकारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तर, ख्रिसमस ट्री च्या आकारात आणि केकवर ख्रिसमस ट्री रेखाटलेले केक ही बाजारात पाहायला मिळतं आहे. हे केक ग्राहकांच्या मागणीनुसार तयार केले जात असल्याची माहिती एका केक विक्रेत्याने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Christ brothers have started crowding the market to buy materials for christmas thane dvr