नाताळ मेळाव्यात सर्वधर्मसमभावाचे अनोखे दर्शन
नाताळ हा जरी ख्रिस्ती धर्मीयांचा सण असला तरी वसईत नुकत्याच साजऱ्या झालेल्या नाताळ मेळाव्यात सर्वधर्मसमभावाचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. मंदिरापासून चर्चपर्यंत ‘बाळ येशू’ची पालखी भजनाच्या तालावर निघाली. हिंदू महंतांनी ही पालखी खांद्यावर घेतली तर मुस्लीम मौलवींना ख्रिस्तजन्माची कथा सांगून अध्यात्माचा अनोखा रंग भरला. ‘अभंग भवन’ या संस्थेने या सर्वधर्मीय नाताळ मेळाव्याचे आयोजन केले होते.
उमेळा येथील साकाई माता मंदिरातून बाळ येथूची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. भजनी मंडळांनी ढोलकीच्या तालाववर भजने म्हणत पालखीला साथ दिली. गिरिधर आश्रमातल्या महंतांनी पालखी आपल्या खांद्यावर आणली, यानंतर पालखीचे अभंग भवन संस्थेत स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या कृतीमुळे सारे वातावरण भारवले होते. या कार्यक्रमात हुजैफा उर्दू स्कूलचे मौलाना यांनी कुराणातील ख्रिस्तजन्मकथा सांगितली. सुविद्या पाटोळे यांनी बेथलहेम या विषयावर आपली दोन गाणी सादर केली. मर्सिस आणि रमेदी येथील मंडळाने नाताळगीते सादर केली.
संस्थेचे अध्यक्ष फादर मायकल यांनी या सर्वधर्म नाताळ मेळाव्याची संकल्पना विषद केली. बेथलहेममध्ये येशूचा जन्म झाला, तेव्हा सर्वप्रथम बाळ येशूनेच त्याचे दर्शन घेतले होते, असे ते म्हणाले. मेंढरे राखणारे धनगर आणि साधूमहंत यांनीच बाळ येशूचे दर्शन घेऊन वंदन केले होते. त्यामुळे आज सर्वधर्मीय एकत्र आले असले तर त्यात वेगळे काही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वधर्मीय नाताळ साजरा करण्यासाठी धर्माचा कर्मठपणा आड येत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. संचालिका सिंथिया बाप्टिसा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत सर्वाचे आभार मानले.