गोन्सालो गार्सिया चर्च
वसईतील बरामपूर येथील गोन्सालो गार्सिया चर्च हे आधुनिक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. भरपूर प्रकाश आणि खेळती हवा, धर्मगुरू आणि भाविक यांच्यामध्ये नसलेला भिंतीचा किंवा खांबाचा व्यत्यय ही या चर्चची काही वैशिष्टय़े. या वैशिष्टय़ांसोबतच चर्चचा इतिहासही रोचक आहे.
माणिकपूरजवळील बरामपूर या गावात चुळणा गावचे मूळ रहिवासी स्थायिक झाले. त्यांनी आपली संकुले बांधली. ही संकुले न्यू बरामपूर या नावाने ओळखली जाऊ लागली. या ख्रिस्ती बांधवांसाठी चर्च बांधण्यासाठी चुळणा गावचे तत्कालीन मेंढपाळ फादर डायगो परेरा यांनी काही जागा निवडल्या. त्या जागेवर फादर गॉडफ्री रेमेडीअस यांनी चर्च बांधायला सुरुवात केली. हे चर्च वसईचे सुपुत्र संत गोन्सालो गार्सिया यांना समर्पित करण्यात आले आहे. त्यामुळे याचे नाव संत गोन्सालो गार्सिया चर्च असे देण्यात आले.
या चर्चला लागूनच संत अगस्टीन हायस्कूल व नाजरेथ हायस्कूल या दोन अग्रगण्य शिक्षण संस्था आहेत. इ. स. १९८६ रोजी जेव्हा पोप द्वितीय जॉन पॉल यांनी भारताला भेट दिली, तेव्हा त्यांचे हेलिकॉप्टर संत अगस्टीन स्कूलच्या पटांगणावर उतरले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतिस्तव गोन्सालो गार्सिया चर्चच्या दर्शनी भागात डावीकडे पोप द्वितीय जॉन पॉल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हे दक्षिणाभिमुखी चर्च आज अनेकांचे आकर्षण ठरले आहे. मंगळूर, गोवा केरळ आदी भागांतून आलेल्या इंग्रजी भाषिक ख्रिस्ती बांधवांना हे चर्च आता सोयीस्कर वाटू लागले की आता ते इंग्रजी भाषिक भाविकांचे चर्च म्हणून गणले जात आहे. गोन्सालो गार्सिया चर्चमध्ये फादर अनिल परेरा हे प्रमुख धर्मगुरू असून फादर अॅम्ब्रॉज फर्नाडिस हे साहाय्यक धर्मगुरू आहेत. तसेच बिशप हाऊस येथील कार्यभार चालवणारे फादर राजेश डाबरे यांचे निवासस्थानदेखील इकडेच आहे. या गावात सुरुवातीला हाताच्या बोटाइतकी स्थानिक कुटुंबे असली तरी आता येथील कुटुंब संख्या दोन हजाराच्यावर गेली आहे.