ज्योतीमाता चर्च

आगाशी आणि अर्नाळा या दोन गावांच्या मध्यावर पुरातन काळात एक चर्च होते त्याला ‘अवर लेडी ऑफ द लाइट’ असे इंग्रजीत म्हटले जात असले तरी त्याचे मूळ नाव ‘नोस्सा सेन्होरा द लुस’ असे दिसून येते. काळाच्या ओघात ते चर्च नष्ट झाले. ते कधी व कसे नष्ट झाले आणि ते कुणी नष्ट केले त्याचा सविस्तर इतिहास उपलब्ध नाही. दरम्यानच्या काळात आगाशी गावात ‘संत जेम्स चर्च’ उदयाला आले आणि ते जुने चर्च विस्मृतीत गेले. अर्नाळाला जाताना ज्योती गावाजवळ ‘फादरवाडी’ नावाचे एक भाट आहे. त्याला ते नाव का पडले व ते त्या चर्चशी निगडित आहे की काय हे शोधून पाहावे लागेल.

सुदैवाने अलीकडच्या काळात ज्योती या गावात एक नवीन चर्च उदयाला आले आहे. त्याचे नाव आहे ‘ज्योतीमाता चर्च’. वास्तविक गावाचे नाव पूर्वापार ‘ज्योती’ आहे. यावरून या गावाचा संबंध प्रकाशाची राणी या जुन्या चर्चशी निगडित असू शकतो. म्हणून या गावाने जेव्हा नवे चर्च बांधायचे ठरवले, तेव्हा या प्रस्तावित चर्चचे नावही ‘ज्योतीमाता चर्च’ असे द्यायचे ठरले.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आगाशी चर्च येथे फादर रिचर्ड मिस्किटा यांची नेमणूक झाली. नवीन चर्च बांधायचा प्रकल्प त्यांनी जेव्हा बोलून दाखवला, तेव्हा गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ‘भूदान मोहीम’ आखली. आपल्या जागेची अदलाबदली करून त्यांनी ५० गुंठय़ांचा एक भूखंड उभा केला. १९८० या वर्षी फादर ज्यो परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली गावाची युवा संघटना स्थापन करण्यात आली, त्या संघटनेने करमणुकीचे विविध कार्यक्रम करून निधी गोळा करण्यास सुरुवात केली. सुदैवाने मुंबई सरधर्म प्रांताचे आर्चबिशप कार्डिनल सायमन पिमेंटा यांनी ज्योती परिसराला भेट देऊन जागेची पाहणी केली. १८ नोव्हेंबर १९८१ रोजी या जागेवर पहिला उपासना विधी पार पडला. मात्र १ जानेवारी २००१ या दिवशी सदर ‘सेंटर हे डॉन बोस्को’ या जगप्रसिद्ध संघाच्या हाती सुपूर्द करण्यात आले. त्यांनी तात्काळ एक नवे चर्च उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आणि ५ डिसेंबर २००४ रोजी या संघाचे विभाग प्रमुख फादर कोयलो यांच्या हस्ते कोनशिला समारंभ पार पडला. ६ मे २००७ रोजी वसई धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे यांच्या शुभहस्ते डॉन बोस्को संघाचे प्रमुख फादर आयवो कोयलो यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आणि ज्योती परिसरातील लोकांचे स्वप्न साकार झाले. या चर्चच्या बांधकामास फादर जेम्स

तुस्कानो यांचे अथक परिश्रम कामी आले. फादर विश्वस परेरा यांनी या संपूर्ण जागेला नंदनवनाचे रूप देऊन टाकले.

या धर्मग्रामात जी लोकवस्ती आहे ते स्थानिक रहिवासी फुलांच्या मळ्यात काम करणारे प्रयोगशील शेतकरी आहेत. या समाजाने आपला पूर्वापार असलेला केळीच्या उत्पन्नाचा जोडधंदा सोडून दिला आणि फूल उत्पादनात कमाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या चर्चच्या उभारणीस आर्थिक साहाय्य मिळाले. आकाशाला गवसणी घालणारा मनोरा, सभोवती हिरवीगार झाडे, समोर उद्यान असणारे हे आकर्षक चर्च पाहण्यासाठी बाहेरगावचे लोकही येतात.