CIDCO to Conect Thane with Navi Mumbai International Airport : ठाण्यातून नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाहतूककोंडी टाळून विनाअडथळा पोहोचता यावं यासाठी २६ किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचा सिडकोचा प्रस्ताव आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डाण व लँडिंगच्या काही चाचण्या यशस्वी झाल्या असून येत्या जून महिन्यात येथून विमान सेवा सुरू करण्याचा सिडको व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा विचार आहे. तत्पूर्वी सरकारने नवी मुंबई व पर्यायाने येथील विमानतळ मुंबईशी जोडणाऱ्या अटल सेतूचं काही महिन्यांपूर्वी लोकार्पण केलं आहे. आात नवी मुंबई विमानतळ ठाण्याशी जोडण्याचा सिडकोचा मानस आहे.

ठाणे शहर नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी सिडको २६ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधणार आहे. या उन्नत मार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार केला जात असून यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड केली जात आहे. येत्या जूनमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. हे विमानतळ व मुंबई-ठाण्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सिडको व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात आता ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्गाची भर पडणार आहे.

सिडकोमधील एका अधिकाऱ्याने दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की “सध्या ठाणे शहर व नवी मुंबई विमानतळ असा प्रवास करण्यासाठी केवळ ठाणे-बेलापूर रोड व पाम बीच रोड असे दोन पर्याय आहेत, जे पूर्ण कनेक्टिव्हिटी प्रदान करत नाहीत. तसेच दोन्ही मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी असते. त्यामुळे लोकांना विमानतळ गाठणं व तिथून ठाणे शहरात पोहोचणं हे अवघड काम आहे. लोकांना एक अखंड व जलद मार्ग प्रदान करणे हे या नवीन उन्नत मार्गाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.”

असा असेल ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग

दिघा येथील पटनी मैदानाजवळील धन निरंकारी चौकापासून वाशीच्या पाम बीच मार्गापर्यंत १७ किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. तो ठाणे-बेलापूर मार्गास समांतर असेल. पाम बीच मार्गापासून थेट विमानतळापर्यंत नऊ किलोमीटरचा दुमजली उन्नत मार्ग उभारला जाईल.

प्रकल्पावर किती खर्च होणार?

या २६ किलोमीटर लांबीच्या कॉरिडोरसाठी ८,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाची व्याप्ती, मंजुरी, भूसंपादन, पर्यावरणीय मंजुऱ्या पाहता प्रकल्प सुरू होणं व तो पूर्ण होण्यासंदर्भात आता वेळ सांगता येणार नसल्याचं सिडकोच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.