ठाणेः नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा येत्या जून महिन्याच्या अखेरीस सुरु होईल असे चिन्हे दिसत असतानाच सिडको प्रशासनाने ठाणे ते विमानतळ असा २६ किलोमीटर अंतराचा उन्नत मार्ग उभारण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. यापूर्वी सिडकोने या मार्गाच्या उभारणीसाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. या आराखड्याचे अद्ययावतीकरणासह इतर आर्थिक बाबींची आखणी करण्यासाठी आता सिडकोने सल्लागार नेमण्याची तयारी सुरु केली आहे. या मार्गाचा समावेश नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातही करण्यात आला आहे. सध्याचा ठाणे ते नवी मुंबई विमानतळ हा अतिशय कोंडीच्या मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
सिडकोकडून पीपीपी तत्त्वावर विकसित केले जात असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार विमानतळ असेल. या विमानतळाचा पहिला टप्पा जून २०२५ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. सुरूवातील दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना याचा लाभ होईल. तर २०३८ मध्ये विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष प्रवाशांना त्याचा फायदा होईल. या विमानतळाच्या पूर्णत्वानंतर प्रवाशांचा प्रचंड ओघ विमानतळाकडे वाढेल. विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील प्रवासी वाहतूक सुद्धा या दिशेला वाढेल. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वेगवेगळ्या उपनगरांना विनाअडथळा विमानतळाशी जोडण्याची आवश्यकता यापुर्वीही व्यक्त झाली आहे. या दृष्टीने सिडको प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. सिडकोने ठाणे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान अखंड उन्नत रस्ता कॉरिडॉरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता. ज्यामध्ये अर्बन मास ट्रान्झिट कंपनी लिमिटेडने सल्लागार म्हणून काम केले होते. प्रकल्प आराखड्याच्या माध्यमातून आरेखन आराखडा, प्रकल्पाच्या परिसरातील विद्यमान आणि प्रस्तावित वाहतूक जाळ्यांची एकात्मता, वाहतूक अभ्यास, पर्यावरण अभ्यास, डिझाइन मानके, खर्चाचा अंदाज, वैधानिक मंजुरी, प्रकल्पांचे फेजिंग, जमीन संपादन, प्रकल्प वित्तपुरवठा पद्धत यांचा आढावा प्रकल्पाच्या अद्ययावतीकरणासाठी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत आणि अखंड रस्ता कॉरिडॉरसाठी सविस्तर प्रकल्प आरखडा आणि व्यवहार सल्लागार सेवांचा समकक्ष आढावा घेण्यासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक केली जाणार आहे.
सध्याचे मार्ग कोंडीचे …
ठाणे आणि आसपासच्या भागातून नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी सध्या ठाणे बेलापूर मार्गच उपलब्ध आहे. हा मार्ग सध्या प्रचंड वर्दळीचा आणि कोंडीचा आहे. त्यामुळे सुमारे २६ किलोमीटरचा थेट मार्ग उभारण्यात येणार आहे. तीन अधिक तीन सहा मार्गिका यात असतील. यामुळे ठाण्यातून थेट नवी मुंबई गाठता येईल. सध्या ठाणे शहर आणि नवी मुंबई विमानतळ असा प्रवास करण्यासाठी केवळ ठाणे-बेलापूर मार्ग आणि पाम बिच रोड असे दोन पर्याय आहेत. या दोन्ही मार्गावरील वाहतूक गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणावर वाढली आहे. ठाणे-बेलापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांना विमानतळ गाठून तेथून ठाणे शहरात तसेच आसपासच्या इतर उपनगरांमध्ये पोहचणे कठीण जाणार आहे. त्यामुळे या नव्या मार्गिकेची आखणी केली जात आहे.
कसा असेल मार्ग ?
दिघा येथील पटनी मैदानाजवळील धन निरंकारी चौकापासून वाशीच्या पाम बीच मार्गापर्यत २६ किलोमीटर अंतराचा हा उन्नत मार्ग असणार आहे . तो ठाणे-बेलापूर मार्गास समांतर असणार आहे. पाम बीच मार्गापासून थेट विमानतळापर्यत नऊ किलोमीटर दुमजली उन्नत मार्ग उभारण्याची आखणीही यानिमीत्ताने केली जात आहे.