लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या डोंबिवलीतील एका नागरिकाला गोव्यातील हॉटेलची ऑनलाईन माध्यमातून बुकिंग करताना फसविण्यात आले आहे. हॉटेलमधील बुकिंगसाठी पाठविलेले २० हजार रूपये पाठविल्यानंतर समोरील आस्थापनेतील कर्मचाऱ्याने तुम्हाला आणखी १९ हजार रूपये पाठवावे लागतील, असे सांगितल्यावर नोंदणी करणाऱ्या नागरिकाला आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात एका इसमा विरुध्द तक्रार केली आहे.
पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे नोकरदार आहेत. ते एका कंपनीत नवी मुंबईत नोकरी करतात. ते डोंबिवली पूर्व भागात टिळक रस्ता भागात कुटुंबीयांसह राहतात.
फसवणूक झालेल्या तक्रारदाराने रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गोवा येथे गेल्यानंतर तेथे कोणत्या हॉटेलमध्ये निवासाची चांगली व्यवस्था होईल म्हणून हॉटेल गुगल उपयोजनवर चाचपणी करत होतो. त्यावेळी आपणास ऑनलाईन माध्यमातून सी ब्रीज कलंगगुट नावाचे संकेतस्थळ दिसले. आपण ते उघडले. तेथे एक संपर्क क्रमांक होता. आपण तेथे चौकशी केली.
त्यावेळी आपणास हॉटेलमध्ये किती खोल्या पाहिजेत अशी विचारणा केली. तुमची सोय होईल असे सांगितले. आपणास हॉटेलमधील खोल्या नोंदणीसाठी किती पैसे पाठवावे लागतील, अशी विचारणा डोंबिवलीतील नागरिकाने हॉटेलशी निगडित व्यक्तिकडे केली. त्यांनी तुम्हाला २० डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ असे पाच दिवस राहायचे असेल तर तुम्हाला २० हजार रूपये भरणा करावा लागेल. त्याप्रमाणे समोरील इसमाने दिलेल्या बँक खात्याप्रमाणे डोंबिवलीतील नागरिकाने आपल्या बँक खात्यामधून ऑनलाईन माध्यमातून २० हजार रूपये हॉटेलमधील खोल्यांच्या नोंदणीसाठी भरणा केले. पाठविलेले पैसे मिळाले का, म्हणून नागरिकाने हॉटेलमधील खोल्यांची नोंदणी करणाऱ्या व्यक्तिकडे चौकशी केली.
त्यांनी हॉटेलमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आणखी १९ हजार ९९९ रूपये भरणा करावे लागतील. आपण सांगितल्याप्रमाणे पैसे भरणा केले आहेत. आता वाढीव पैसे कसले मागता, असा प्रश्न नागरिकाने केला, पण समोरील व्यक्ति पैसे भरण्यासाठी अडून बसला. यावेळी आपली हॉटेलमधील खोल्यांची नोंदणी करताना फसवणूक झाली आहे हे निदर्शनास आल्यावर डोंबिवलीतील नागरिकाने रामनगर पोलीस ठाण्यात गेल्या शनिवारी आपली आर्थिक फसवणूक सी ब्रीज कलंगगुट संकेतस्थळामधील इसमाने केल्याची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.