उद्याने, बगिचे आणि वृक्षसंगोपन धोरणाची गरज
शहरातील उद्याने, हरितपट्टे आणि आसपासची जंगले ही शहराच्या फुप्फुसाचे काम करत असतात. उद्याने, झाडेझुडुपे, डोंगर परिसर आणि खारफुटी हा परिसाचा समावेश हरीत पट्टय़ांमध्ये येत असून असे हरित जमिनी टिकवण्याचे आव्हान पुढील काळात कल्याण-डोंबिवलीकरांपुढे आहे. अतिक्रमणांचा विळखा, अनधिकृत बांधकाम आणि इमारतींसाठी होणारी वृक्षतोड अशा संकटांचा सामना करणाऱ्या शहरवासीयांच्या दृष्टीने हरितपट्टे जपणे हा कळीचा मुद्दा असून त्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. वृक्षसमितीच्या माध्यमातून वृक्षतोडीसाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्यांमध्ये आढळणारी अनियमितता यामध्ये सध्याचे सत्ताधारी मंडळी गुंतली असून पुढील काळात हरितपट्टय़ांच्या रक्षणाची जबाबदारी घेणारे लोकप्रतिनिधी असावे, अशी अपेक्षा नागरिक करत आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात व्यापक प्रमाणामध्ये हरित जमिनी असली तरी तिचे संगोपन करण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत नाहीत. उद्यानांचे मनोरंजन पार्क करत असताना तेथील निसर्ग सौंदर्याचा बट्टय़ाबोळ करण्याबरोबरच शहराच्या आसपासच्या वन भूमीवरील अतिक्रमणे रोखण्यासाठीही कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाहीत.

उद्यानांची दुरवस्था
’कोळसेवाडी परिसरात असलेल्या राजर्शी शाहू उद्यानाची बजबजपुरी झाली आहे.
’सुभाष चौकातील शंकरराव झुंजारराव उद्यानामध्ये तत्कालीन महापौरांच्या संकल्पनेतून नक्षत्र गार्डन साकारण्यात आले होते. मात्र काही दिवसांमध्येच या उद्यानाचा ताबा भिकारी, गर्दुल्ले आणि बेघरांनी घेतला आहे.
’डोंबिवलीमध्येही हीच परिस्थिती असून येथील सुशिक्षित नगरसेवकांनीही हरितपट्टा वाढवण्याच्या दृष्टीने व्यापक प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
’ मोठी झाडे वाढवण्याचा प्रयत्न मात्र कमी पडले आहेत.