कल्याण पूर्वेत तिसगाव नाका येथे भुयारी जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा विभागाकडून काँक्रीटीकरणाचा रस्ता खोदण्यात आला होता. या रस्त्याखाली जलवाहिनी टाकून झाल्यानंतर खड्डे पडलेल्या रस्त्यावर वाहिनीसाठी खोदलेला रस्ता डांबरीकरणाने बुजवून टाकण्यात आला. सर्वाधिक वर्दळीच्या या रस्त्यावरील खड्डे काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे खराब होऊन या रस्त्यावरील डांबरीकरण निघून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
खड्ड्यांमुळे या भागात वाहने चालकांकडून संथगतीने चालविली जातात. त्यामुळे या भागात नेहमी वाहन कोंडी होते. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत या रस्त्यांवर शाळेच्या बस धावतात. या भागातील खड्डे, वाहन कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यास विलंब होतो. खड्डे पडल्यानंतर करण्यात आलेले डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे असते हे या खड्ड्यांमुळे दिसते अशा या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.
खड्डे बुजविण्याच्या कामावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ठेकेदार मनमानी करून खड्डे भरणी करतो. हे काम कुचकामी असल्याने दोन दिवसात खड्ड्यांवरील डांबर आणि खडी रस्त्यावर येते अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. १३ जून रोजी तिसगाव नाका भागातील खड्डे पालिकेच्या ठेकेदारांनी भरले होते. ते १५ दिवसांनी साध्या पावसाने खराब झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या खड्डे भरणीच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
शहरात काँक्रीटीकरणाचे रस्ते बांधताना रस्त्याच्या एका बाजुला सेवा वाहिन्या टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था (डक्ट) करा, अशी मागणी अनेक वर्ष ज्येष्ठ वास्तुविशारद, रस्ते बांधणी तज्ज्ञ पालिकेकडे करत आहेत. त्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. ही स्वतंत्र व्यवस्था झाली तर वारंवार काँक्रीटीकरण, डांबरीकरणाचे रस्ते फोडण्याची वेळ प्रशासनावर येणार नाही, अशा जाणकारांच्या सूचना आहेत.
पावसाळ्यापूर्वी मे महिना अखेरपर्यंत कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव भागातील रस्त्यांवरील खड्डे डांबरीकरणाने भरणे आवश्यक होते. १० प्रभागातील अभियंत्यांनी खड्डे भरणे कामाचे प्रस्ताव एप्रिल मध्येच शहर अभियंता विभागाकडे पाठविले होते. परंतु, शहर अभियंत्यांच्या सुट्ट्या, त्यानंतर या विभागातील संथगती कामामुळे या कामाच्या निविदा प्रक्रियाच मेमध्ये शहर अभियंता विभागाकडून सुरू करण्यात आल्या. आता कमी दराच्या ठेकेदाराच्या निविदा स्वीकारण्यात आल्या आहेत, असे बांधकाम विभागाचे अभियंते सांगतात. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रभागांमध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांना नागरिकांच्या सध्या सामोरे जावे लागते. पावसाळ्यापूर्वी खड्डे भरणीची करावयाची कामे उशिरा का सुरू झाली याविषयीची तक्रार एका जाणकार नागरिकाने आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. अधिक माहितीसाठी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना संपर्क साधला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. घरगुती कारण आणि हाताच्या दुखण्यामुळे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी रजेवर होते. प्रभारी आयुक्तांकडून तात्पुरते काम उरकले जाते. प्रशासनावर सध्या कोणाचा अंकुश नाही. नागरिकही पालिकेच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.