लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानावर फटाके विक्री स्टॉलना परवानगी देण्यात आली तर त्याला कठोर विरोध केला जाईल, असा इशारा या मैदानावर नियमित खेळणे, फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी दिला आहे. नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना पत्र लिहून भागशाळा मैदानावर फटाके विक्री स्टॉलला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.
डोंबिवली पश्चिमेत भागशाळा मैदान हे मध्यवर्ति ठिकाणचे मैदान आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील नागरिक याठिकाणी फिरण्यासाठी येतात. लहान मुले येथे मैदानी खेळ खेळतात. क्रिकेटचे खेळ येथे सकाळ, संध्याकाळ खेळले जातात. नागरिकांची या मैदानाला असलेली पसंती पाहून या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी मागील अनेक वर्षापासून या मैदानाची निगा राखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले आहेत. पालिकेचे मैदान असुनही नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत या उद्देशाने या सुविधा म्हात्रे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा-घोडबंदर मार्गावर मेट्रो स्थानकाच्या निर्माणासाठी वाहतुक बदल
अनेक ज्येष्ठ नागरिक, वृध्द याठिकाणी आपल्या नातवंडांना घेऊन फिरण्यासाठी येतात. लहान मुले मैदानातील लाल मातीत रमतात. या मैदानात यापूर्वी विविध प्रकारचे उत्सव पालिकेच्या परवानगीने भरले जात होते. परंतु, उत्सव संपल्यानंतर मैदानाची पूर्णता खराबी आयोजकांकडून केली जात होती. तेव्हापासून नागरिकांनी भागशाळा मैदानात कोणत्याही प्रकारच्या उत्सव, फटाके विक्री स्टॉलना विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्सव संपल्यानंतर मांडवांचे खड्डे, कचरा, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे कप मैदानभर पडलेले असतात. तो कचरा नागरिकांना उचलावा लागत होता. त्यामुळे या मैदानावर यापुढे एकही उत्सव होणार नाही यादृष्टीने नागरिकांनी निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा-कल्याण डोंबिवलीतील कचरा विल्हेवाटीचे ९९ कोटीचे प्रस्ताव मंजूर
दिवाळी सणानिमित्त पालिकेने भागशाळा मैदानात नागरिकांना फटाके स्टॉलना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्टॉल मैदानात लावण्यात आले तर नागरिक, खेळाडू प्रखर विरोध करतील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे.
भागशाळा मैदानाला विरोध होत असेल तर फटाके विक्रेत्यांना स्टॉलसाठी जागा द्यायची कुठे असाही प्रश्न प्रशासनासमोर आहे. भागशाळा मैदानाच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आलेल्या यादीत फटाके स्टॉल विक्रीसाठीच्या नऊ मैदानांच्या यादीत भागशाळा मैदानाचा उल्लेख आहे.