ठाणे : सायबर गुन्हेगारांकडून तयार केलेले डिजीटल अटकेच्या सापळ्यात नागरिकांची फसवणूक होऊ लागली आहे. मागील ११ महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील डिजीटल अटक प्रकरणात १३ गुन्हे दाखल असून यामध्ये नागरिकांची तब्बल सात कोटी ८० लाख ४९ हजार ८२४ इतक्या रकमेची फसवणूक झाली आहे. सर्वाधिक फसवणूकीची प्रकरणे ठाण्यातील वागळे इस्टेट आणि घोडबंदर भागातील नागरिकांची आहे.
व्हिडीओ काॅल करून सीबीआयचे किंवा तपास यंत्रणातील अधिकारी असल्याचे भासवून अटकेतून सुटका मिळवून देतो या नावाखाली फसवणूक केली जात आहे. यामध्ये ४५ वयोगटापुढील व्यक्ती आणि वृद्धांना सर्वाधिक लक्ष्य केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनेकदा फसवणूक झालेले नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे प्रमाण अधिक असू शकते.
आपल्या आयुष्याची जमापूंजी अनेकजण बँकांमध्ये साठवून ठेवत असतात. परंतु या जमापूंजीवर आता सायबर गुन्हेगारांची नजर पडू लागली आहे. देशभरात मागील काही दिवसांपासून डिजीटल अटकेच्या नावाखाली फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. मागील नऊ महिन्यांत देशभरात डिजीटल अटकेच्या नावाखाली ११ हजार ३३३ कोटी रुपयांच्या फसवणूकीची प्रकरणे उघड झली आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रातही डिजीटल अटकेच्या माध्यमातून फसवणूकीची प्रकरणे वाढत आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या कालावधीत डिजीटल अटकेच्या माध्यमातून फसवणूकीची १३ प्रकरणे समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये तब्बल सात कोटी ८० लाख ४९ हजार ८२४ रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये वयोवृद्धांचे प्रमाणही वाढत आहे. अनेकजण सेवा निवृत्त होत असतात. आयुष्याची जमापूंजी ते बँक खात्यात साठवित असतात. परंतु अशी ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर या नागरिकांना मोठ्या मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे.
काय आहे डिजीटल अटक
डिजीटल अटकेच्या प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीला संपर्क साधून त्यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार, विदेशातील संशयास्पद कुरिअर, मुलाला अटकेची भिती, फसवणूक, अमली पदार्थ तस्करी, छळवणूकीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काही वेळाने व्यक्तीला व्हाट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ काॅल केला जातो. या व्हिडीओ काॅलमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा किंवा पोलीस असल्याचे भासविले जाते. सीबीआय, मुंबई सायबर पोलीस, ईडीचे अधिकारी इत्यादी. संबंधित व्यक्ती पोलिसांचा गणवेशही परिधान करून असतो. खोट्या आरोपांसाठी पीडितांना अटक करण्याची धमकी दिली जाते. अनेकदा फसवणूकीसाठी बोगस वकिल देखील तयार केले जातात. व्यक्ती घाबरल्यानंतर त्याला व्हिडीओ काॅल द्वारे अटकेपासून बचावासाठी पैशांची मागणी केली जाते. त्यानंतर ऑनलाईन माहिती मागवून व्यक्तीचे बँक खाते रिकामे केले जाते.
हेही वाचा…दिव्यातील शाळेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुख्य आरोपी फरार, तर प्राध्यापिका अटकेत
कोणतेही अनोळखी व्यक्तीने संपर्क केल्यास त्या व्यक्तीला तुमची वैयक्तीत माहिती, बँकेचा तपशील देऊ नये. शक्यतो अशा व्यक्तींसोबत बोलणे टाळावे. पोलीस कधीही व्हिडीओ काॅलद्वारे अटकेची माहिती देत नाहीत. फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० क्रमांकावर संपर्क साधावा.
दाखल गुन्हे – फसवणूक झालेली रक्कम
वागळे इस्टेट – ५ कोटी ४८ लाख
वर्तकनगर – ८५ लाख
मानपाडा- ७४ लाख
कासारवडवली – ३५ लाख ४३ हजार २०
कापूरबावडी – ११ लाख ५० हजार
खडकपाडा – ९ लाख १० हजार
कोळशेवाडी – ७ लाख २१ हजार
मुंब्रा – ६ लाख
शांतीनगर – २ लाख ५० हजार
भिवंडी शहर – १ लाख ७५ हजार ८०४
एकूण – ७ कोटी ८० लाख ४९ हजार ८२४
मागील काही दिवसांपासून डिजीटल अटकेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत आहे. नागरिकांना पोलिसांकडून असे अटकेबाबतचे व्हिडीओ काॅल केले जात नाहीत. आम्ही या महिन्यात उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा, महाविद्यालय, बँका याठिकाणी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेतले आहेत. सायबर गुन्हे टाळण्यासाठी काय करावे याची माहिती फलकांवर प्रसिद्ध करत आहोत. – प्रकाश वारके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.