ठाणे : सीपी तलाव परिसरातील ठाणे महापालिकेच्या कचरा हस्तांतरण केंद्रावर साठलेल्या कचऱ्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले असून त्यात या कचऱ्याच्या ढिगाला शुक्रवारी आग लागल्याने शिंदेचे समर्थक आक्रमक झाले. यापुढे या केंद्रावर एकही कचरा गाडी आणू नका आणि गाडी आणण्याचा प्रयत्न केला तर गाड्या फोडून टाकू असा इशारा शिंदे समर्थकांनी दिल्याने पालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. याठिकाणी शहरातील विविध भागात संकलित होणारा कचरा आणला जातो आणि त्यानंतर त्याचे वर्गीकरण केले जाते. यानंतर तो डायघर येथे नेला जातो. असे असले तरी याठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत. या कचरा हस्तांतरण केंद्राजवळ लोकवस्ती, मोठमोठे गृहसंकुले तसेच औद्योगिक कंपन्या आहेत. कचरा हस्तांतरण केंद्रामुळे परिसरात पसरलेल्या दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिक हैराण आहेत. हे कचरा हस्तांतरण केंद्र हटविण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे. शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी राम रेपाळे यांनीही यापुर्वी हे केंद्र बंद करण्याची मागणी पालिकेकडे केली होती. यामुळे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी काही महिन्यांपुर्वी हा परिसर कचरामुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी परिसरात वर्षानुवर्षे साठलेला सुमारे ३० मेट्रिक टन कचरा जादा मनुष्यबळ, गाड्यांचा वापर करून उपसण्याचे काम सुरू केले होते.

परंतु पालिका अद्यापही हा परिसर कचरामुक्त करू शकलेली नाही. असे असतानाच, या केंद्रातील कचऱ्याच्या ढिगाला शुक्रवारी मोठी आग लागली. या आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच या भागात असलेल्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना याचा खूप त्रास झाला. नागरिकांकडून रोष व्यक्त होऊ लागला. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के, पदाधिकारी राम रेपाळे, एकनाथ भोईर, प्रकाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हा परिसर कचरामुक्त करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसून याउलट येथे आणखी कचरा आणू टाकला जात आहे. पालिकेकडून कामाची देयके दिली जात असली तरी, याठिकाणी दुर्गंधी रोखण्यासाठी फवारणीही केली जात नाही, असा आरोप शिंदे समर्थकांनी यावेळी केली. तसेच यापुढे या केंद्रावर एकही कचरा गाडी आणू नका आणि गाडी आणण्याचा प्रयत्न केला तर गाड्या फोडून टाकू असा इशारा रेपाळे यांनी दिला.

Story img Loader