ठाणे : घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या जोडणीबरोबरच रस्त्याच्याकडेला मोठ्या गटाराच्या बांधणीची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू असून त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी खोदाईची कामे सुरू आहेत. या कामादरम्यान उडणारी धुळ इतरत्र उडू नये यासाठी कामाच्या ठिकाणी पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे खोदाई आणि रस्त्यावर इतरत्र पसरलेल्या माती धूळ इतरत्र उडत असल्याने नागरिक हैराण झाले असून या रस्त्याची अक्षरश: धुळधाण झाल्याचे दिसून येत आहे.
ठाणे शहरातील वाहतूकीसाठी मुंबई-नाशिक आणि घोडबंदर असे दोन मार्ग महत्वाचे मानले जातात. या मार्गांवर गेल्या काही वर्षांपासून मेट्रो मार्ग उभारणीचे काम सुरू आहे. याशिवाय, घोडबंदर येथील कासारवडवली चौकात उड्डाणपुल उभारणीचे काम सुरू आहे. या कामांमुळे दोन्ही मार्ग अरूंद झाल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. असे असतानाच त्यात आता घोडबंदर मार्गावरील कामादरम्यान होत असलेल्या धुळ प्रदुषणामुळे नागरिक अक्षरश मेटाकुटीला आले आहेत. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या जोडणीची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतली आहेत. या कामांचा एक भाग म्हणून मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या मधोमध असलेली ही गटारे बुजवून त्याऐवजी रस्त्याच्या कडेला गटारे उभारणीची कामे सूरू आहेत.
माजिवाडा ते ओवळापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही कामे सूरू आहेत. या कामांसाठी जागोजागी खोदाई करण्यात येत आहे. त्याजागी सिमेंट काँक्रीटची गटारे बांधण्यात येत आहे. या कामादरम्यान, कामाच्या ठिकाणी पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याने सर्वत्र धुळीचे चित्र आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेच्या मुख्य प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माहिती व जनसंपर्क विभागाशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पालिकेचेही दुर्लक्ष
ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती बांधकामे आणि वाहन संख्येमुळे धुळ प्रदुषणात वाढ होत असून हे प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेने काही वर्षांपुर्वी एक नियमावली तयार केली आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांची विविध कामे करत असताना धुळ प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या नाहीतर पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. या नियमावलीचे पालन करीत नसलेल्या बांधकाम व्यावसायिकांना पालिकेने काही दिवासंपुर्वी नोटीसा बजावून कामे थांबविण्याचे आदेश दिले होते. असे असले तरी घोडबंदर मार्गावरील मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीच्या कामादरम्यान उडणारी धुळ इतरत्र उडू नये यासाठी कामाच्या ठिकाणी पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे.
रस्ते खोदताना किंवा रस्ता दुरुस्तीचे काम करताना वॉटर स्प्रिंकलर्स, रेन गन स्प्रिंकलरचा वापर करणे. ज्या रस्त्याचे काम चालू आहे, त्या रस्त्याच्या बाजूने मार्गरोधक बसविणे. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना ट्रक ताडपत्रीने झाकलेले असावेत, असा नियम रस्ते कंत्राटदार, मेट्रोचे कामांसाठी नियमावलीत आहे. परंतु घोडबंदर सेवा रस्त्यांवर बांधण्यात येत असलेल्या गटारांवर अनेक ठिकाणी झाकणे दिसून येत नाहीत. यामुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.