कल्याण – मागील तीन दिवसांपासून ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता परिसरात महावितरणच्या विजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक वेळा पाच ते सहा तास या भागातील वीज पुरवठा बंद असतो. वीज पुरवठा का बंद आहे, यासाठी महावितरण कार्यालयात संपर्क केला तर तेथील संपर्क क्रमांक सतत व्यस्त असतो, अशा तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या आहेत.

डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील ९० फुटी, खंबाळपाडा, कांचनगाव, ठाकुर्ली हा नवीन गृहसंकुलांनी विकसित झालेला भाग आहे. बहुतांशी मध्यवर्ग या भागात राहतो. महावितरणला या वीज देयकाच्या माध्यमातून चांगला महसूल या भागातून मिळतो. कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीतील हा भाग ग्रामीण भागात येत नाही. तरीही ९० फुटी रस्ता परिसराचा वीज पुरवठा विविध कारणांनी बंद असतो. या विजेच्या वाढत्या लपंडावामुळे नागरिक हैराण आहेत.

कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. घरात बसुनही अंगाची लाही लाही होत आहे. अशा परिस्थितीत वीज पुरवठा बंद झाल्यानंतर घरातील पंखा, वातानुकूलित यंत्रणा, शीतकपाट बंद राहते. या कालावधीत घरात राहणे असह्य होते. रात्रीच्या वेळेत वीज पुरवठा बंद झाल्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर गारव्यासाठी बाहेर पडतात. बाहेर डासांचा हल्ला होतो, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.

महापालिकेकडून पाणी पुरवठा होण्याच्या काळात वीज पुरवठा बंद असेल तर गृहसंकुलांमधील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी येत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पाण्याची वाट पाहावी लागते. सकाळी पाणी आले की ते इमारतीवरील टाकीवर चढून मग गृहसंकुलांचा पाणी पुरवठा सुरू होतो, अशी माहिती या भागातील रहिवासी मंदार अभ्यंकर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. घरातील पंखा, वातानुकूलित यंत्रणा बंद असली की घरातील रुग्ण, लहान बालके, बिछान्याला खिळून असलेले रुग्ण अस्वस्थ होतात. ९० फुटी रस्ता भागात उपहारगृह आहेत. अनेक खासगी आस्थापनांची कार्यालये या भागात आहेत. त्यांना वीज पुरवठा बंद असली की झळ बसते.

महावितरणच्या ९० फुटी रस्ता भागातील नियंत्रक अधिकाऱ्याने सांगितले, दोन दिवसापूर्वी पालिकेचे रस्ते काम सुरू असताना जेसीबीने या भागातील एक भूमिगत वीज वाहिनी तोडून टाकली होती. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा बंद होता. तो वीज पुरवठा पूर्ववत करेपर्यंत वेळ गेला. या भागातील पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी पूर्वनियोजित वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. त्याची माहिती नागरिकांना दिली होती. बुधवारी सकाळी या भागात एक वीज वाहिनीत बिघाड झाला आहे.तो पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक बिघाडाशिवाय या भागातील वीज पुरवठा खंडित होत नाही, असे अधिकारी म्हणाला.