डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीचा सुभाष रस्ता मागील तीन महिन्यापूर्वी रस्ता रूंदीकरण आणि सीमेंट काँक्रीट रस्ते कामासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधणीची कामे सुरू आहेत. हा रस्ता तीन महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. कोणत्याही कामात गती नसल्याने या भागातील रहिवासी, प्रवासी धुळीने, डासांमुळे हैराण आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्त्याच्या दुतर्फा खोदून ठेवण्यात आल्याने अनेक वेळा या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. गटारांचे पाणी जागोजागी अडून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. तुंबलेल्या गटारांच्या ठिकाणी दुर्गंधी येत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील धूळ दररोज घरात येत असल्याने रहिवाशी धुळीने त्रस्त आहेत. सततच्या धुळीच्या त्रासाने या भागातील रहिवासी सर्दी, खोकल्याने त्रस्त आहेत.डोंबिवली पश्चिमेतून सुभाष रस्ता, चिंचोड्याचा पाडा, कुंभारखाणपाडा, राजूनगर, गणेशनगर, सरोवरनगरकडे जाण्यासाठी सुभाष रस्ता हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहने अधिक संख्येने धावतात. त्यामुळे धूळ उडण्याचे प्रमाण अधिक आहे.

पुणे, मुंबईत आलेल्या साथीचा रोगाचा विचार करून एमएमआरडीए, पालिकेने ही कामे लवकर पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांना धूळ, डासांचा त्रास होणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी, अशी मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी केली आहे.या रस्ते मार्गात गटार कामांमध्ये काही झाडांचा अडथळा येत होता. ही झाडे तोडण्यासाठी आपण पालिकेच्या उद्यान विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर गटार बांधणी मार्गातील झाडे तोडण्यात आली. ही गटारे बंदिस्त राहणार असल्याने या गटारांना योग्य बाजुने उतार द्यावा. जेणेकरून गटारातील सांडपाणी विनाअडथळा वाहून जाईल, असे सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले. तीन महिन्यांपासून सुभाष रस्ता खोदून ठेवल्याने या रस्त्याच्या दुतर्फा असणारे व्यापारी, दुकानदार धुळीने त्रस्त आहेत.

सुभाष रस्त्यावरील गटार बांधणीची कामे गतीने सुरू आहेत. या कामात काही झाडांचा अडथळा होता म्हणून काम थांंबले होते. ही झाडे काढण्यात आल्याने गटार बांधणीची कामे गतीने सुरू केली आहेत.- मुकादम,गटार बांधकामधारक

सुभाष रस्त्यावर गटार बांधणीत अडसर येणाऱ्या झाड तोडण्याला उद्याने विभागाने परवानगी दिली आहे. ते झाड तोडण्यात आले असून गटार बांधणीचे काम सुरू झाले आहे.- महेश देशपांडे, अधीक्षक,उद्यान विभाग, डोंबिवली.

मागील तीन महिन्यांपासून सुभाष रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. रहिवासी, व्यापारी या रखडलेल्या कामाने, धूळ, डासांनी त्रस्त आहेत. पालिका, रस्ते ठेकेदाराने हे काम लवकर पूर्ण करावे.-प्रल्हाद म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते.