लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण जवळील मोहने येथील स्मशानभूमी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरुन खांद्यावरुन, रुग्णवाहिकेतून पार्थिव नेताना नागरिक, वाहन चालकांना कसरत करावी लागते. उन्हाळ्यात खाचखळ्यातून तर पावसाळा सुरू झाल्याने चिखलातून येजा करावी लागते.
या स्मशानभूमीच्या बाजुला नागरी वस्ती आहे. या भागातील नागरिक, विद्यार्थी या रस्त्याचा वापर करतात. त्यांचीही या चिखलातील रस्त्यावरुन येजा करताना दमछाक होते. या रस्त्यावरुन वाहन जात असेल तर पादचाऱ्यांच्या अंगावर अनेक वेळा चिखल उडतो. शाळकरी विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो.
हेही वाचा… जितेंद्र आव्हाडांच्या निष्ठा थोरल्या पवारांपाशी
तीनशे मीटरच्या या रस्त्यावरील खडी बाहेर आली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबत असल्याने अनेक वेळा तुंबलेल्या पाण्यातील टोकदार खडीचा अंदाज न आल्याने पादचाऱ्यांना चालताना पायाला दुखापती होतात. वाहनांचे टायर फुटत आहेत, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
हेही वाचा… ठाणे जिल्ह्यात वाहतूक कोंडी
मोहने येथील स्मशानभूमीच्या रस्त्याची दुरवस्था पाहून या भागातील एका माजी नगरसेवकाने हा रस्ता डांबरीकरणाचा तयार करण्यात यावा म्हणून पालिकेत प्रस्ताव दिला होता. या प्रकरणाची नस्ती तयार करण्यात आली होती. परंतु, नंतर या रस्त्याची नस्ती कुठे गायब झाली ते कळले नाही, असे एका माजी नगरसेवकाने सांगितले.
हेही वाचा…
कल्याण डोंबिवली शहरांसाठी हजार कोटीचा निधी आणला म्हणून वल्गना करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मोहने येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुस्थितीत रस्ता नाही याची दखल घेण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून केली जात आहे. पालिका अधिकारी याविषयी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.