ठाणे : ठाणे शहरातील टपाल कार्यालयांची झालेली दुरावस्था, काही टपाल कार्यालये हद्दीबाहेर गेल्याने नागरिकांची होणारी ससेहोलपट आणि अपुऱ्या सुविधा याबाबत नागरिकांकडून टपाल कार्यालयांबाबत तक्रारी सुरू झाल्या आहेत. याच तक्रारींबाबत आमदार संजय केळकर यांनी नुकतीच टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना सूचना केल्या. तसेच प्रशासनाच्या मदतीबरोबरच आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ठाणे शहरातील सर्व टपाल कार्यालये सक्षमपणे कार्यरत होण्यासाठी, नवीन टपाल कार्यालये निर्माण करण्यासाठी आणि स्थलांतरीत झालेली कार्यालये पुन्हा मूळ जागी आणण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी संबंधित नागरिक आणि टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलशेत येथील सॅण्डोज बाग टपाल कार्यालयाचे नामकरण कोलशेत टपाल कार्यालय करण्याबाबत केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. पूर्वीचे सॅण्डोज हे नावच आता अस्तित्वात नसल्याने टपालाची जागा कोलशेत भागात असल्याने त्याचे नामकरण करण्याबाबत त्यांनी सूचना केली. तसेच जे.के. ग्राम टपाल कार्यालयासाठी जी जागा उपलब्ध केली आहे. ती तळघरात असल्याने ती बदलून पालिकेकडे नवीन जागेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. नौपाडा भागातील टपाल कार्यालय हे दमाणी इस्टेट येथे गेली ५० वर्षे होते. इमारतीच्या पुनर्विकासानंतर विकासकाने त्याच जागेत कार्यालयासाठी जागा देण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली. वागळे इस्टेट येथे सध्या टपाल कार्यालय नसून १९८४ पासून असलेल्या टपाल कार्यालय ठाणे स्थानकाजवळील कार्यालयातून कार्यरत असल्याने नागरिकांना गैरसोईचे होत आहे. त्यामुळे हे कार्यालय वागळे इस्टेट येथे पुन्हा स्थलांतरीत करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. टपाल कार्यालयाची उपयुक्तता गरीब, मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणात असते. संपूर्ण शहरात याबाबत दुरावस्था असून नागरिकांनी त्रस्त होऊन निवेदने दिली होती. पुढील काळात सर्व टपाल कार्यालये सक्षम होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens are suffering due to the remoteness of post offices mla sanjay kelkar holds a meeting with officials amy