डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील सत्यवान चौकातील जुगार अड्डा आणि देवीचापाडा येथील खाडी किनारच्या जेट्टीवर गांजा सेवन करणाऱ्यांच्या अड्ड्यांमुळे स्थानिक रहिवाशांंबरोबर शहरातून खाडी किनारी फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक त्रास होत आहे. महिलांना जीव मुठीत घेऊन या भागात फिरावे लागते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून गैरकृत्यांविरुध्द जोरदार मोहीम सुरू असताना विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील देवीचापाडा येथील सत्यवान चौकात एक जुगार अड्डा २४ तास सुरू आहे. हा अड्डा सत्यवान चौकातील खंडोबा मंदिर समोरील महालक्ष्मी सुपर मार्केट जवळ आणि दत्तु साई इमारतीजवळ गल्लीत असलेल्या एका मोडक्या चाळीत सुरू आहे. या जुगार खेळणाऱ्यांची वाहने मुख्य रस्त्यावर उभी केलेली असतात. त्यामुळे पादचारी, वाहन चालकांना त्यांचा त्रास होतो. स्थानिक रहिवासी या जुगार अड्ड्यामुळे त्रस्त आहेत.

हेही वाचा >>>डोंबिवलीत दत्तनगरमध्ये महारेरामधील, बेकायदा इमारतीचे विकासकाकडून तोडकाम

या जुगार अड्ड्यावर येणारे बहुतांशी खेळगडी हे यापुर्वीचे गुन्हेगार, तडीपार गटातील असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. याविषयी उघड बोलले तर जुगार अड्डा चालक त्रास देतील या भीतीने उघडपणे कोणीही रहिवासी याविषयी बोलत नाही. या चाळीवर पोलिसांची धाड पडली तर पाठीमागून पळण्यासाठी चाळीतून एक चोर वाट एका इमारतीच्या आवारातून ठेवण्यात आली आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अड्डा सुरू असतो, असे देवीचापाडा भागातील रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा >>>देशातील पहिल्या समुद्री भुयारी मार्गिकेतून इतक्या वेगात धावणार बुलेट ट्रेन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

तसेच, देवीचापाडा खाडी किनारच्या गणेशघाट विसर्जन जेट्टीवर गांजा सेवन करणाऱ्यांच्या झुंडी दररोज दुपारी दोन नंतर दाखल होतात. रात्री उशिरापर्यंत ते जेट्टीच्या बाजुला अंत्यविधी कार्यासाठी बांधण्यात आलेल्या निवाऱ्यात, बाजुच्या खारफुटीच्या झाडांखाली गांजा सेवन करत बसलेले असतात. याठिकाणी त्यांचा दिवस, रात्री उशिरापर्यंत धिंगाणा असतो, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. देवीचापाडा खाडी किनारा ठिकाणी सकाळ, संध्याकाळ अनेक महिला, पुरूष निसर्गरम्य परिसर म्हणून कुटुंबीयांसह फिरण्यास येतात. खाडी किनारी गांजा सेवन करणाऱ्यांचे अड्डे असल्याने त्यामुळे नागरिकांना खाडी किनारी जाता येत नाही. महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक या अड्ड्यांमुळे या भागात अलीकडे फिरकत नाहीत, असे समजते.

देवीचापाडा भागातील स्थानिक, काही जाणकार नागरिक या सगळ्या प्रकाराविषयी तीव्र नाराज आहेत. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून सर्व पोलीस ठाणे हद्दीत गैरधंदे करणाऱ्यांविरुध्द जोरदार कारवाया सुरू असताना स्थानिक पोलिसांना हे गैरधंदे दिसत नाहीत का असे प्रश्न स्थानिक रहिवासी करत आहेत. पोलीस उपायुक्त झेंडे यांनी सत्यवान चौकातील जुगार अड्डा, देवीचापाडा जेट्टी येथील गांजा अड्डे उध्वस्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens are troubled by gambling and marijuana dens in devichapada dombivli news amy