कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त व्हावा यासाठी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन एकीकडे प्रयत्नांची शर्थ करीत असले तरी डोंबिवलीतील उर्सेकरवाडी, शिव मंदिर भागातील फेरीवाले मात्र आयुक्तांच्या पथकाला सातत्याने गुंगारा देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून रवींद्रन यांनी रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने गस्त सुरू ठेवली आहे. असे असले तरी मुख्य रस्त्यावरून पाहणी करणाऱ्या आयुक्तांच्या पथकाचा उर्सेकरवाडीतील फेरीवाले मात्र डोळा चुकविताना दिसत आहेत.
रवींद्रन डोंबिवलीत फडके रस्ता, नेहरू रस्त्याने सहसा दौरा काढतात. आयुक्तांच्या गस्त पथकामुळे प्रभाग अधिकाऱ्यांकडून या रस्त्यावरील फेरीवाले सकाळ-संध्याकाळ हटवले जातात. त्यामुळे आयुक्तांना रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाल्याचा भास होतो. फडके रस्त्यावरून चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौकातून रेल्वे स्थानकाजवळील रॉथ रस्त्याने रामनगर वाहतूक कार्यालयासमोरून आयुक्तांचे वाहन डोंबिवली पश्चिमेत जाते. पूर्व भागात वाहन फिरत असताना आयुक्त वाहनात बसून फेरीवाले रस्त्यांवर आहेत की नाहीत याची खात्री करतात. मात्र उर्सेकरवाडीकडे त्यांचे कसे दुर्लक्ष होते याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
वर्षांनुवर्षे एकाच खुर्चीत ठाण मांडून बसलेल्या एका पालिका कर्मचाऱ्याचे या फेरीवाल्यांशी संधान आहे. त्यामुळे हा कर्मचारी या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई होऊ देत नसल्याचे या भागातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आयुक्त ई. रवींद्रन यांनी पालिकेच्या डोंबिवली कार्यालयात आपले वाहन उभे करावे. तेथून पायी प्रवासाने उर्सेकरवाडी, कामत मेडिकल पदपथ, शिव मंदिर ते अगदी गांधीनगर भागातील रस्त्यांची पाहणी केली तर येथील रस्ते फेरीवाल्यांनी कसे गजबजून गेले आहेत ते दिसेल, अशी प्रतिक्रिया या भागातील एका व्यावसायिकाने दिली.
उर्सेकरवाडी, शिव मंदिर, गांधीनगर रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांची पाठराखण करणाऱ्या फेरीवाला हटाव पथक व संबंधित प्रभाग अधिकारी, नियंत्रकाला निलंबित करण्याची मागणी जागृत भारत सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. उर्सेकरवाडी, शिव मंदिर परिसरातील पदपथ, रस्ते अडवून बसलेल्या फेरीवाल्यांची छायाचित्रे आपण आयुक्तांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविणार आहोत, असे संस्थेमार्फत सांगण्यात आले.
आयुक्त आले तरी, फेरीवाले आपल्या जागेवर ठाम
टिळक सिनेमागृहाच्या गल्लीत, कामत मेडिकलसमोरील पदपथावर, शिव मंदिर रस्त्यावर फेरीवाले आयुक्त आले तरी ठाण मांडून बसलेले असतात. उर्सेकरवाडी, कामत मेडिकल पदपथावरील सर्व फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई फेरीवाला हटाव पथकाकडून का करण्यात येत नाही, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहेत.
नागरिकांची नाराजी; नगरसेवकाचा पवित्रा
मनसेचे रामनगर प्रभागाचे नगरसेवक मंदार हळबे यांच्याकडूनही या प्रकरणी ठोस पावले उचलली जात नसल्याने प्रभागातील रहिवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. आपण केलेल्या मागणीमुळे आयुक्तांनी फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई सुरू केली आहे, असा दावा हळबे यांनी केला आहे. उर्सेकरवाडी, शिव मंदिर रस्त्यावरील प्रकार आपण आयुक्तांच्या निदर्शनास आणणार आहोत, असे ते म्हणाले.