कल्याण – कल्याण पश्चिमेतील प्रबोधनकार ठाकरे सरोवरात (काळा तलाव) प्रवेशासाठी पहाटे चारची वेळ ठेवण्यात यावी. आणि रात्री १० वाजता सरोवर बंद करण्यात यावे, अशी मागणी प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथे नियमित पहाटे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या मागणीचा विचार करून आपण यासंदर्भात एक निवेदन आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांना देणार आहोत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि नियमित प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथे फिरण्यासाठी येणारे बाबा रामटेके यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रबोधनकार ठाकरे सरोवर हा कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारितील प्रकल्प आहे. याठिकाणी शिवसेनाप्रमुखांचे स्मारक, दीड किमी लांबीचा गोलावर चालण्यासाठी पदपथ आहे. तलावात कारंजे आहेत. सकाळ, संध्याकाळ कल्याण परिसरातील नागरिक येथे फिरण्यासाठी, विरंगुळ्यासाठी येतात. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशावरून या तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये अल्पवयीन तरुणीवर सामुहिक बलात्कर करणारे चार जण अटक

ठाकरे सरोवर पालिकेकडून दररोज सकाळी पाच वाजता उघडून सकाळी ११ वाजता बंद केले जाते. दुपारी ११ ते चार वाजेपर्यंत सरोवराचे प्रवेशव्दार कुलुप बंद केले जाते. या वेळा नागरिकांना सोयीच्या वाटत नसल्याने रहिवाशांनी या वेळा बदलण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. मधुमेह, करोनानंतरचे आजार, निद्रानाश असे आजार असलेले, याशिवाय दररोज सकाळी सात वाजता कार्यालयीन कामासाठी घर सोडणारे अनेक नागरिक पहाटेच्या वेळेत प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथे फिरण्यासाठी येतात. काही नागरिक साडेतीन वाजल्यापासून ठाकरे सरोवर भागात येऊन फिरण्यास सुरुवात करतात. पहाटे पाच वाजता सरोवराचा प्रवेशव्दारे उघडला की तेथे प्रवेश करतात. सकाळीच कामावर जाणाऱ्या नोकरदारांना पहाटे पाच वाजता तलाव परिसरात फिरून घरी जाऊन कार्यालयात जाण्याची तयारी करताना धावपळ होते. यामुळे सध्याची पहाटे पाचची वेळ पहाटे चार वाजताची करावी, अशी मागणी नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ठाकरे सरोवर रात्री ११ वाजता बंद केले जाते. या कालावधीत अनेक तरुण सरोवराच्या आतील भागात येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात. खाण्यासाठी आणलेल्या वस्तू, प्लास्टिक पिशव्या तलावा भोवतीच्या चालण्याच्या मार्गात फेकून देतात. रात्रीच्या वेळेत फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होतो. अनेक कुटुंब महिला, मुलांसह रात्रीच्या भोजनानंतर ठाकरे सरोवर भागात येतात. त्यांना दारू पिणाऱ्यांच्या धिंगाण्याचे दर्शन होते. भांडण नको म्हणून नागरिक याविषयावर गप्प राहतात. पालिका सुरक्षा रक्षक, नियंत्रक अधिकारी याविषयी आक्रमक भूमिका घेत नसल्याने मद्यपान करणारे त्याचा गैरफायदा घेतात, असे नागरिकांनी सांगितले. रात्री ११ वाजता ठाकरे सरोवराचे प्रवेशव्दार बंद करण्याऐवजी ते रात्री १० वाजता बंद करावे. यामुळे तलाव भागात सुरू असलेले गैरप्रकार थांबतील, असे नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिकेत नस्तींचा आता ऑनलाइन प्रवास, मानवी हस्तक्षेप, नस्ती गहाळ होण्याला पूर्ण विराम

“अनेक नागरिक सकाळी सात वाजता कार्यालयात जाण्यासाठी घर सोडतात. हे नागरिक ठाकरे सरोवर भागात पहाटे चारपूर्वी फिरण्यासाठी येतात. काही व्याधीग्रस्त नागरिकांचा यात समावेश आहे. सरोवर पहाटे चार वाजता खुले करावे आणि गैरप्रकार टाळण्यासाठी सरोवर रात्री १० वाजता बंद करावे.”, अशी मागणी कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens demand to change the entry time of prabodhankar thackeray sarovar in kalyan ssb
Show comments