लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे- दिवाळी सणानिमित्त नागरिकांमध्ये शनिवारी खरेदीचा उत्साह दिसून आला. शहरातील जांभळीनाका, गोखले रोड, राममारुती रोड, गावदेवी परिसर नागरिकांच्या गर्दीने भरलेले पाहायला मिळाले. कपडे, इलेक्ट्रॅानिक वस्तू, मिठाई यांसह इतर दुकानांमध्ये ग्राहकांच्या स्वागतासाठी खास सजावट केली होती, तसेच वस्तूंच्या खरेदीवर विविध सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर खरेदी करताना वेगळाच आनंद होता. या गर्दीमु‌‌ळे बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.

दिवाळी सण हा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्त मुंबई, ठाणे तसेच उपनगरातील मुख्य बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनं, कपडे, मिठाई, आकाश कंदील, विद्यूत माळा, पणत्या, रांगोळी या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी शनिवारी संध्याकाळी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

धनत्रोयदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. धनत्रोयदशीच्या दिवशी सोन किंवा इतर वस्तू खरेदी करण्यास शुभ मानले जाते. या शुक्रवारी धनत्रोयदशीचा सण आला आहे. त्यामुळे ग्राहक शनिवारपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करत आहेत. ठाण्यातील राममारूती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, गावदेवी परिसर विद्यूत रोषणाईने उजळून निघाला आहे. या विद्यू रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधत आहेत.

आणखी वाचा-ठाणेकरांनो…खरेदीसाठी बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतूक बदल…

आकाश कंदील, विद्यूत माळा, पणत्या, रांगोळी या साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा बाजारात पारंपारिक आणि पर्यावरणपूरक असे विविध प्रकारात आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. हे पर्यावरणपूरक कंदिल खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल आहे. तसेच दिवाळी पहाट निमित्त तरुण मुला-मुलींसाठी कपड्यांमध्ये विविध प्रकार आले आहेत,त्यामुळे कपड्यांच्या दुकानातही ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.

सराफ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, कपडे, मिठाई या दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रसन्न वाटावे यासाठी उत्तम सजावट करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी या दुकानांमध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा-मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन

खरेदीमुळे शहरात कोंडी

दिवाळीनिमित्त खरेदीसाठी शनिवारी मोठ्यासंख्येने नागरिक खासगी वाहने घेऊन घराबाहेर पडली होती. यामुळे रस्त्यावर वाहनांचा भार वाढला होता. शहरातील जांभळीनाका बाजारपेठ, नौपाडा परिसर, स्थानक परिसर, राम-मारुती रोड येथील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना कोंडीचा फटका बसल्याचे चित्र होते. या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरु होती. तर, जांभळीनाका बाजारपेठेतून स्थानककडे येण्याचा टीएमटी बस गाड्यांचा मार्ग आहे. या मार्गावर शनिवारी ऐन संध्याकाळी एक बस बंद पडली, त्यामुळे तासभर याठिकाणी इतर बस गाड्या आणि वाहने अडकून होती. जांभळीनाका बाजारपेठ ते स्थानक गाठायला वाहनांना अर्धातासाहून अधिक वेळ लागला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens flock to shopping in the market on diwali mrj