कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या जनता दरबारात सहभागी होण्यासाठी नागरिकांना यापुढे आपल्या तक्रारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या ‘केडीएमसी २४ बाय सात’ या उपयोजनवर ऑनलाईन माध्यमातून अगोदर नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. या तक्रारींची प्रशासनाकडून छाननी झाल्यानंतर या तक्रारी जनता दरबारात घेतल्या जातील, असे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी तीन ते पाच वेळेत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचा जनता दरबार असतो. या दरबारात आपले म्हणणे मांडण्यासाठी सुमारे दोनशेहून अधिक नागरिक नागरी समस्या आणि पालिकेशी संबंधित इतर तक्रारी घेऊन येतात. दोन तासांच्या अवधीत एवढ्या तक्रारींचे निराकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक नागरिक नाराज होतात. पालिका अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यापुढे जनता दरबारात दाखल होणारी तक्रार ही पहिले पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तपासली जाईल. या तक्रारीचे स्वरुप आणि ही तक्रार पुन्हा पुन्हा आयुक्तांसमोर मांडली जाते का, याची खात्री पटल्यावरच ती तक्रार जनता दरबारासाठी घेतली जाईल. सतत त्याच स्वरुपाच्या तक्रारींची छाननी करून मगच त्या जनता दरबारात घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक नागरिक आपल्या तक्रारी शासनाचे विविध विभाग, आपले सरकार, समाज माध्यमांतून करत असतात. शासनाच्या विविध विभागातून त्या तक्रारी निराकरण करण्यासाठी पालिकेत पाठविल्या जातात. त्याचवेळी नागरिकही त्याच तक्रारी घेऊन पालिकेत जनता दरबारात येतात. एका तक्रारीसाठी पालिका अधिकाऱ्यांना शासन, त्यांचे विविध विभाग यांनाही उत्तर द्यावे लागते. समाज माध्यमातील तक्रारींना स्पष्टीकरण द्यावे लागते.

एकाच साच्यातील तक्रारींचे स्वरूप कमी करण्यासाठी, काही ठराविक तक्रारदार हे ठराविक तक्रारी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सगळ्या एकाच प्रकारच्या वाढत्या तक्रार अर्ज आणि त्यांना उत्तरे देण्याच्या प्रक्रियेला आळा बसावा. प्रत्येक तक्रारीचे पालिका अधिकाऱ्यांना निराकरण करता यावे, एकाच ठराविक तक्रारदाराची तक्रार जनता दरबारात उत्तर देण्यासाठी येऊ नये साठी प्रशासनाने जनता दरबारात तक्रार दाखल करण्यापूर्वी ती पालिकेच्या ऑनलाईन उपयोजनवर दाखल करावी. या तक्रारींची पालिका अधिकारी दखल घेऊन त्याचे निराकरण करतील.

ऑनलाईन माध्यमातून छाननी झालेल्या तक्रारीच आयुक्तांच्या जनता दरबारात घेण्यात येतील. यापूर्वी जनता दरबारात निकाली काढलेल्या तक्रारी पुन्हा जनता दरबारात विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आतापर्यंत आयुक्तांनी अनेक वेळा जनता दरबार आयोजित केले, पण त्या दरबारात आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड उपस्थित नव्हत्या, अशा तक्रारी निर्भय बनोचे संस्थापक महेश निंबाळकर, तक्रारदार उज्वला पाटील यांनी केल्या.

Story img Loader