डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील डोंबिवली पश्चिमेतील पाच रस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सार्वजनिक बांंधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बांधकाम खात्यास रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी दिले आहेत. या कामांचे आदेश होऊन दोन महिने झाले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कंत्राटदार डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील तीन रस्त्यांची कामे सुरू करत नसल्याने नागरिकांना खडीच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
३१ मे पर्यंत रस्ते सुस्थितीत असले पाहिजेत असा नियम आहे. डोंबिवली पश्चिमेतील रस्त्यांंची दुर्दशा झाली आहे. हे खराब रस्ते पालिका सुस्थितीत का करत नाहीत म्हणून नागरिक पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेत आहेत. या रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काँक्रिटीकरण करण्यासाठी दिली आहेत. या रस्त्यांवर देखभालीचा खर्च केला आणि बांंधकाम विभागाने काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले तर पालिकेचा खर्च वाया जाणार आहे, अशी भीती पालिका अधिकाऱ्यांना आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत गुप्ते रोडवरील जवाहिऱ्याला फसवून सोन्याच्या ऐवजाची चोरी
पालिका अधिकारी नियमित एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून डोंबिवली पश्चिमेतील कार्यादेश झालेली काँक्रिटची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना विनंंती करत आहेत. या दोन्ही विभागाचे अधिकारी पालिका अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे लक्षच देत नसल्याचे समजते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींंद्र चव्हाण डोंबिवलीत राहतात. आपल्या शहरातील नागरिकांना आपल्या विभागाच्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे मातीच्या, खड्डेमय रस्त्यावरून चालावे लागते म्हणून मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, ठेकेदारांचे काम उपटून ही रखडलेली कामे तात्काळ मार्गी लागतील असे आदेश देण्याची मागणी नागरिक करत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून डोंबिवली पश्चिमेतील प्रस्तावित काँक्रिटीकरणाची कामे हाती घ्यावीत म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी बाळा म्हात्रे पालिका, शासनाकडे प्रयत्नशील आहेत.
प्रस्तावित रस्ते कामे
देवीचापाडा येथील गोपीनाथ चौक लक्ष्मी नारायण कृपा इमारत ते वर्तुळकार रस्ता, श्रीधर म्हात्रे चौक, अनमोल नगरी ते वर्तुळकार रस्ता, सुभाष रस्ता रेल्वे स्थानक भाग ते कुंभारखाणपाडा या तीन वर्दळीच्या रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडून केली जाणार आहेत. दोन महिन्यापूर्वी या कामाचे आदेश मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहेत. जुनी डोंबिवली ठाकुरवाडीतील काँक्रिट कामे सुरू आहेत. भावे सभागृहा जवळील कामे पूर्ण झाली आहेत.
हेही वाचा >>>ठाणे : कोलशेत खाडी भागातील राडारोड्याचा भराव पालिका काढणार
सार्वजनिक बांंधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने डोंबिवली पश्चिमेत आमची रस्ते कामे सुरू आहेत, असे सांगितले.
डोंबिवली पश्चिमेतील पाच रस्त्यांची कामे एमएमआरडीएने सार्वजनिक बांधकाम विभागाला काँक्रिटीकरणासाठी दिले आहेत. ही कामे तातडीने सुरू करावीत म्हणून एमएमआरडीए, बांधकाम विभागाला कळविले आहे.-मनोज सांगळे, कार्यकारी अभियंता, कडोंमपा.
डोंबिवली पश्चिमेतील रखडलेली काँक्रिट रस्ते कामे करण्याची पीडब्ल्युडी अधिकाऱ्यांची इच्छा नाही. ही कामे येत्या आठवड्याभरात सुरू झाली नाही तर आपण सार्वजनिक बांधकाम विभागा्च्या कल्याण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहोत.-बाळा म्हात्रे,शिवसेना पदाधिकारी, डोंबिवली.