ठाणे : घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही, तोपर्यंत त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात ठिय्या मांडण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करत नागरिकांनी आंदोलन करू नये म्हणून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. दरम्यान, घोडबंदरमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा निघाला नाहीतर रास्ता रोको करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गेल्याकाही वर्षांमध्ये घोडबंदर मार्गाची झालेली दैना, मेट्रो मार्गिकेची कामे, वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी अपुऱ्या उपाययोजना, अवजड वाहनांची घुसखोरी आणि अपघात यामुळे जिल्ह्यात घोडबंदर भाग कोंडीचे केंद्रबिंदू ठरू लागला आहे. बुधवारपाठोपाठ गुरुवारी या मार्गावर कोंडी झाली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले. कोंडीमुळे अनेक विद्यार्थी शाळेमध्ये पोहचू शकले नाही. रोंजदारीवर असलेल्या नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी जाता आले नाही. तर अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिक देखील कोंडीत अडकले होते. प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे पालक कोंडीमुळे चिंतेत होते. महिला प्रवासी अक्षरश: रडकुंडीला आल्या होत्या. तर काही प्रवासी संताप व्यक्त करत होते.
हेही वाचा – बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराचा थरार; पैशांच्या वादातून फलाटावरच गोळीबार, एक जखमी
हेही वाचा – अडीच तास विद्यार्थी बसमध्येच! विद्यार्थ्यांचा अर्धावेळ होतोय कोडींत खर्चीक
घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या नागरिकांनी जस्टीस फॉर घोडबंदर रोड या नावाने चळवळ सुरू केली आहे. त्या माध्यमातून तीन ते चार नागरिक गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेण्यासाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात जमले होते. परंतु मुख्यमंत्री निवासस्थानी उपस्थित नव्हते. यामुळे त्यांची भेट होत नाही, तोपर्यंत तिथेच थांबण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. यामुळे पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला. तसेच नागरिकांनी आंदोलन करू नये म्हणून पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्रित जमण्यास पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. घोडबंदरमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा निघाला नाहीतर रास्ता रोको करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.