करोना काळानंतर यंदाची दिवाळी नागरिकांकडून मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये इलेक्ट्राॅनिक वस्तू, सोन, कपडे, मिठाई, आकाश कंदील, विद्यूत माळा, पणत्या, रांगोळी या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी शुक्रवारी संध्याकाळी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.
हेही वाचा >>>ठाणे स्थानक परिसरात आमदार संजय केळकर यांची पाहणी
धनत्रोयदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. धनत्रोयदशीच्या दिवशी सोन किंवा इतर वस्तू खरेदी करण्यास शुभ मानले जाते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील राममारूती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, गावदेवी परिसर या मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती. यंदा करोनाचा प्रादूर्भाव ओसरला असून निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व सण-उत्सव जल्लोषात साजरा करण्याकडे नागरिकांचा कल आहे. तसेच बाजारात सर्वत्र ठिकाणी विद्यूत रोषणाई करण्यात आली असल्यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आकाश कंदील, विद्यूत माळा, पणत्या, रांगोळी या साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत.
हेही वाचा >>>ठाण्यात मियावॉकी तंत्रज्ञानाद्वारे वनराई फुलविण्याचे नियोजन ;शहरातील आठ जागांची पालिकेने केली निवड
यंदा बाजारात धागा, बांबू, कागद, कपड्यापासून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक आकाश कंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा सर्वाधिक कल आहे. सोनं, इलेक्ट्राॅनिक वस्तू, वाहन, कपडे, मिठाई या दुकानांमध्येही ग्राहकांना प्रसन्न वाटावे यासाठी उत्तम सजावट करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंवर मोठमोठ्या सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील या सवलतींचा लाभ घेण्यासाठी या दुकानांमध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत. स्थानक परिसर, गावदेवी परिसर तसेच गोखले रोड या भागात रांगोळी, पणत्या, स्टिकरसह काही विक्रेते छोटे शोभेचे आकाश कंदील, विणकाम केलेले तोरण, आकर्षित माळा यांसारख्या गोष्टींची लहान विक्रेत्यांकडून विक्री केली जात आहे. कमी दरात हे वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे याठिकाणी देखील नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत.